हिंगणघाट जळीत कांड : पीडितेची प्रकृती स्थिर पण चिंताजनक
हिंगणघाट जळीत कांडप्रकरणातील पीडितेच्या तब्येतीचा अहवाल समोर
हिंगणघाट : हिंगणघाट जळीत कांडप्रकरणातील पीडितेच्या तब्येतीचा अहवाल समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून या तरुणीला जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आज या घटनेला पाच दिवस पूर्ण झाले असून पीडितेची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पीडितेचं हृदयाचे ठोके वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच तिचा ब्लड प्रेशर कमी जास्त होत असून हे तिच्या तब्येतीसाठी चांगल नसल्याचेही ते म्हणाले.
डाव्या हाताच्या बोटांमध्ये सुधारणा पण उजव्या हाताच्या बोटांमध्ये सुधारणा नसल्याचे डॉक्टर म्हणाले.
पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेला असून तिचे दात काळे झाले आहेत. तोंड आतून जळले असून चेहरा विद्रुप झाला आहे. कृत्रिमरित्या तिचा श्वास सुरू असून डेड स्किन काढली आहे. ती सध्या अतिदक्षता विभागात असून एक दीड महिना मेहनत घ्यावी लागेल असे सांगण्यात येत आहे.
संतापाची लाट
हिंगणघाट शहरात नागरिकांचा मोर्चा सुरु झाला असून यामध्ये विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हिंगणघाटमधल्या तरुणामध्ये या घटनेबाबत संतापाची लाट पसरलीय.