गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत (Hingoli) ठिकठिकाणी लागलेल्या एका पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. शहरात दहशत पसरवणाऱ्या चार आरोपींना वॉन्टेड घोषित करण्यात आलं असून त्यांचे फोटो असलेले मोठमोठे बॅनर शहरभर लावण्यात आलेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या चार आरोपींमधले दोन आरोपी ही चक्क पोलिसांचीच मुलं आहेत. शांतता सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचीच मुलं हिंगोली शहरात दहशत पसरवत आहेत.


हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भर दिवसा लूटमार खून दरोड्याच्या घटना घडत आहेत. याच काळात बँक लुटण्याचा, शेतकरी बाजार लुटण्याचा, बँक कर्मचाऱ्याच्या घरात जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, धूम स्टाईलने पैसे पळविण्याच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे.


वाळू चोरी, मटका, जुगार राजरोस सुरू असल्याने हिंगोलीच्या आमदारांनी लाक्षणिक उपोषण सुद्धा केलं होतं. व्यापारी आणि नागरिकांनी पोलिसांच्या विरोधात एक दिवसीय बंद पाळून हिंगोलीचं बिहार बनविल्याचा आरोप हिंगोली पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवला होता. 


23 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 च्या सुमारास हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या बेलवाडी शिवारातील तानाजी बांगर यांच्या शेतात शिवम सुरेश कुरील आणि त्याचे मित्र गेले होते. जुन्या वादातून आरोपी सागर काळे, विक्की काळे, अभय चव्हाण, अक्षय गिरी आणि करण राजपूत यांनी तलवार, लोखंडीने रॉडने शिवम आणि त्याच्या मित्रांवर जीवघेणा हल्ला केला. तानाजी बांगर यांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती. 


यापैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर चार फरार आरोपींना वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलं होतं. चार ही फरार आरोपींची हिंगोली पोलिसांनी हिंगोली शहरात वॉन्टेड म्हणून पोस्टर लावली आहेत. विशेष म्हणजे फरार आरोपींपैकी विकी काळे आणि सागर काळे ही दोन आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांची मुलं आहेत. 


याबाबत हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलाय. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलिसांतर्फे योग्य बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे.