गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि संजय दत्त यांचा लगे रहो मुन्ना भाई (lage raho munna bhai) हा चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. गांधीगिरीच्या (Gandhigiri) माध्यमातून बदल घडवण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये एक वृद्ध व्यक्ती अधिकाऱ्याला धडा शिकणऱ्यासाठी निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न करतो. यानंतर शरमेने तो अधिकारी वृद्ध व्यक्तीचे काम करतो. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील हिंगोली (hingoli) जिल्ह्यातही पाहायला मिळाला आहे. गांधीगिरीच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलिसांना कामाची जाणीव करुन दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगोलीच्या वसमत येथील लिटिल इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सुरू असताना धक्कादायक प्रकार सुरु होता. यानंतर स्नेहसंमेलन सोडून विद्यार्थ्यांना शिक्षकांसह थेट पोलीस ठाणे गाठावे लागलं आहे. कार्यक्रम सोडून विद्यार्थी आहे त्या वेशभूषेत पोलीस ठाण्यात पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला होता. छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, पोतराज, भारत माता अशा पोशाखामध्ये विद्यार्थी पोलीस ठाण्यात पोहोचले होते.


नेमकं काय घडलं?


लिटिल इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सुरु असताना आजूबाजूच्या परिसरातील काही टवाळखोर थेट या कार्यक्रमात घुसले. मद्यपान करुन टवाळखोरांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिक्षकांनी याला विरोध केला असता टवाळखोरांनी हातात शस्त्र घेऊन धमकावण्याचा प्रयत्न केला. शाळेमध्ये सुरु असलेला प्रकार पाहून विद्याार्थी आणि त्यांचे पालकही भयभीत झाले. हा प्रकार थांबत नसल्याने शाळा व्यवस्थापाने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले.


मात्र शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार वारंवार पोलिसांच्या कानावर टाकून वसमत शहर पोलिसांनी याची दखल घेतली नाही. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून विद्यार्थी आणि शिक्षक संतप्त झाले. त्यांनी आहे त्या कपड्यात रात्री दहा वाजचा थेट पोलीस ठाणे गाठले. विविध वेशभूषा करुन आलेले विद्यार्थ्या पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले. जोपर्यंत टवाळखोरांवर कारवाई होत नाही तो पर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला. विद्यार्थ्यांच्या या पवित्र्यामुळे पोलिसांची एकच भंबेरी उडाली. यानंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी नरमाईची भूमिका घेतली.


पोलिसांनी सीसीटीव्ही बघून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांनी पोलीस ठाणे सोडले. दुसरीकडे कार्यक्रमाच्या आधीच शाळा व्यवस्थापनाने बंदोबस्तासाठी पोलिसांकडे लेखी अर्ज केला होता. मात्र तोही पुरवण्यात आला नाही. या गंभीर प्रकारानंतर वसमतचे कर्तव्यदक्ष पोलीस दोन तास सतत संपर्क करूनही शाळेत पोहचले नाहीत हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तसेच पोलीस या टवाळखोरांवर काय कारवाई करणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.