मुंबई : कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो लोक येतात. हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा होतो. यंदा या शौर्यदिनाला २०२ वर्षं पूर्ण होत आहेत. १ जानेवारी १८१८ साली पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं भीमा नदीच्या काठावर दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये तुंबळ युद्ध झालं.इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत ५०० सर्व जातीय सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला हरवलं.
 
या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला. लढाईत इंग्रजांच्या २७५ सैनिकांचा मृत्यू झाला. तर पेशव्यांचे ६०० च्या आसपास सैनिक मृत्यूमुखी पडले, असे दाखले अनेक ऐतिहासिक पुस्तकांमधून देण्यात आलेत. या विजयाचं प्रतिक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभ उभारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावर युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या विजयस्तंभाला भेट दिली होती. २०१० पासून मोबाईल क्रांतीनंतर हा इतिहास सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचला आणि इथली गर्दी वाढू लागली, असं सांगितलं जातं.


१ जानेवारी २०१८ रोजी २०० वा शौर्यदिन साजरा होत असताना इथं मोठी दंगल उसळली. दंगलीत कोट्यवधी रूपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं. सणसवाडीच्या राहूल फटांगडे या तरूणाला नाहक जीव गमवावा लागला. तेव्हापासून शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर इथं कडेकोट बंदोबस्त तैनात केला जातो.


कोरेगाव-भीमा दंगलीनंतर या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त होतं. पण तिथंच आता सामाजिक सलोखा जपण्याचे प्रयत्न अनेकजण करतायत. यंदाही लाखो लोक इथं अभिवादन करण्यासाठी येतील. हा शौर्य दिन शांततेत साजरा व्हावा आणि कोणत्याही अनुचित प्रकाराचं गालबोट लागू नये, एवढीच माफक अपेक्षा.