chhatrapati shivaji maharaj wagh nakh : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानं खळबळ उडालीय. लंडनहून आणली जाणारी वाघनखं अफजलखानाचा वध करताना वापरण्यात आली नाही असा दावा त्यांनी केला आहे. 


वाघनखांचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफजलखानाचा वध करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं 16 नोव्हेंबरला लंडनहून मुंबईत दाखल होतील. या वाघनखांवरून राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगलाय. विरोधकांनी वाघनखांवरून सरकारला धारेवर धरलंय. अशातच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी ही वाघनखं शिवरायांची नाहीत असा दावा केलाय. त्यामुळे वाघनखांचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 


व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये जमा झालेलं वाघनख हे शिवरायांचं असू शकत नाही


इंद्रजित सावंत यांच्या म्हणण्यानुसार शिवरायांनी अफजलखानाचा वध करताना जे शस्त्र वापरलं ते कुठे आहे याची स्पष्टता 1919 पर्यंत होती. हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे 1919 च्या आधी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये जमा झालेलं वाघनख हे शिवरायांचं असू शकत नाही असा दावा त्यांनी केलाय. दुसरीकडे अनेक इतिहासकारांचे पुरावे तपासूनच वाघनखांबाबत खातरजमा केल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आलाय.  वाघनखांवरून विरोधकांनी आधीच सरकारवर ओरखडे ओढलेत त्यात इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानं सरकार आणखी घायाळ झालंय.


लंडनहून आणली जाणारी ती वाघनखं कुणाची? 


सरकार म्हणतंय लंडनला असलेली वाघनखं छत्रपती शिवरायांचीच तर ती वाघनखं अफजलखानाच्या वधासाठी वापरण्यात आली नव्हती असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केलाय. आता जर हा दावा खरा असेल तर मग लंडनहून आणली जाणारी ती वाघनखं कुणाची? असा सवालही यानिमित्तानं उपस्थित होणं स्वाभाविक आहे.