मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा अखंडीत ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूर येथे सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील उपस्थित होते. देशमुख म्हणाले, मानाच्या पालख्या ३० जून रोजी पंढरपूर येथे आपापल्या मठात मुक्कामास येतील. ३० तारखेला नऊही संतांच्या पालख्या येतील. त्यामध्ये फक्त १८ ते २० वारकरी असतील



आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच, एक जुलै रोजी चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर सर्व मानाच्या पालख्या मठात विसावतील. दोन जुलै रोजी सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल मंदीर येथे दर्शनासाठी येतील. त्याच दिवशी संध्याकाळी सर्व पालख्या आपल्या गावी मार्गस्थ होतील. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर असे साकडे देशमुख यांनी महाद्वार चौकातून श्री विठ्ठल रूक्मिणीचरणी घातले. 




कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.