Honour Killing: `माझ्या वडील आणि भावाला फाशी द्या` डोळ्यांसमोर पतीची हत्या पाहणारी विद्या खंबीर!
Sambhajinagar Honour killing Case: विद्या आणि अमित यांनी दोन महिन्यांपूर्वी पळून जाऊन विवाह केला होता हा प्रेमविवाह होता विद्याच्या घरून अमितच्या जातीमुळे विरोध होता हा विरोध इतक्या टोकाला गेला की अखेर अमितचा खून करण्यात आला.
Sambhajinagar Honour killing Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी व भावानेच मुलीच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बापानेच मुलीचा संसार उद्ध्व्स्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी वडिलांना व भावाला अटक केली आहे. तर, मुलगी विद्या हिनेही वडिलांना व भावाला फाशीची शिक्षा व्हायला हवी, असं ती म्हणते आहे.
अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, दोघांचीही जात वेगवेगळी असल्याकारणाने दोघांच्या घरातून विरोध होता. अखेर अमितच्या घरातल्यांनी त्यांचं नातं मान्य करुन त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. मात्र, विद्याच्या कुटुंबीयांनी राग मनात धरुन ठेवला होता. छत्रपती संभाजीनगरमधील इंदिरानगर येथे दोघे राहत होते. 14 जुलै रोजी विद्याच्या वडिल आणि चुलत भावाने अमितवर पोटात व छातीत खोलवार वार केले. घाटीच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. तर, मुलगी विद्या हिनेदेखील तिच्याच वडिल आणि भावाच्या विरोधात उभं राहात पतीसाठी न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी माझा विचार केला नाही, मी त्यांचा विचार कसा करु, असं म्हणत तिने भावाला व वडिलांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. झी 24 तास सोबत बोलताना तिने ही इच्छा व्यक्त केली आहे.
विद्या म्हणतेय की, माझा संसार सुरू झाला होता. त्यांनी तो विचार केला नाही. माझा भाऊ असो की वडील माझा संसार उद्ध्वस्त केला. त्यांना फाशीची शिक्षा द्यायलाच हवी. माझ्या घरुन लग्नाला विरोध होता. माझं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आम्ही बाहेर जाऊन लग्न केले. एक महिना आम्ही बाहेर राहिलो होतो. तेव्हा माझा चुलत भाऊ प्लानिंग करत होता. अमितचे मित्र सांगत होते. आप्पासाहेब आमच्याविरोधात प्लानिंग करत होता. तुमचा सैराट करु अशा धमक्या देत होता. आमच्या जीवाला धोका होता म्हणून कोणाला संपर्क केला नाही.
माझ्या नवऱ्यावर हल्ला करण्यात आला. तेव्हा मला कोणीही पुढे जाऊ दिलं नाही. नंतर अमितला रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांना जगायचं होतं. त्यांना घरी यायचं होतं. रुग्णालयात असतानाही ते म्हणत होते आप्पासाहेबांनी मारलं. माझा हात धरला होता त्यांना आणि तिथेच जीव सोडला, असं विद्याने म्हटलं आहे.
मी त्यांना न्याय देणारच मी शेवटपर्यंत लढेन. त्यांच्या आईवडिलांना माझ्याकडे बघून हिंमत येते. मग मी कशी हिंमत करु. मी त्यांच्याकडे बघून जिवंत आहे. त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. माझा पूर्ण संसार गेला माझा नवरा गेला. वडिल मुलीचा विचार करतात. त्यांनी नाही केला. सध्या माणुसकीला महत्त्व आहे ती जपली पाहिजे, असंही विद्या म्हणते.