साताऱ्यात घोडे सफारीचा व्यवसाय बंद, पर्यटकांमध्ये नाराजी
घोड्यावरून पडून एका पर्यटकाचा या टेबललॅन्ड वर मृत्यू झाला
सातारा : पाचगणीच्या टेबललॅन्डवर गेल्या अनेक वर्षापासुन सुरु असणारा घोडा गाडी, घोडे सफारीचा व्यवसाय गेल्या दहा दिवसापासून बंद ठेवण्यात आलाय. थंड हवेचे ठिकाण आणि अनेक मोठ मोठ्या शाळा असलेले पाचगणी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे विस्तीर्ण पठार असलेले टेबललॅन्ड देखील याच पाचगणीत आहे . या टेबललॅन्ड वर अनेक वर्षांपासून पर्यटक घोडा गाडी आणि घोडे सफारीचा आनंद घेत असतात पण काही दिवसापूर्वी घोड्यावरून पडून एका पर्यटकाचा या टेबललॅन्ड वर मृत्यू झाला. त्यानंतर पाचगणी नगरपालिकेने आणि पाचगणी पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षेचा योजना राबवायला सुरुवात केली आहे.
व्यावसायिक हवालदिल
या पाचगणीच्या टेबललॅन्ड वर घोडा गाडी आणि घोडे सफारी बंद असल्याची माहिती पर्यटकांना या ठिकाणी आल्यावरच समजते आहे त्यामुळे अनेक पर्यटक नाराज होऊन जातायत . ऎन दिवाळीचा सण तोंडावर आला असताना टेबल लॅन्ड वर बंदी असल्याने घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
यापुढील काळात कोणतीही दुर्घटना घडु नये यासाठी पालिकेने विशेष खबरदारी घेऊन नियमावली घालणे गरजेचे आहे.
'पिढीजात सुरु असलेला घोडा व्यवसाय गेल्या १० दिवसांपासून बंद असून पुढे १० दिवस बंद राहणार असल्याने त्यामुळे आम्ही उदर्निवाह साठी करायचे काय ?' असा प्रश्न उपस्थित केला जातोयं.
८ ते १० दिवस लागणार
घोडे व्यावसायिकांना लायसन्ससाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यास सांगितल गेलंय. घोड्यावर बसणाऱ्या पर्यटकाला डोक्यावर हेल्मेट आणि गुढग्याला नीपॅड देण्यासाठी सुद्धा नगरपालिकेने घोडे व्यावसायिकांना सूचना केल्या आहेत.
या सर्व बाबींची पूर्तता होण्यासाठी आणि घोडा गाडी सफारी सुरु होण्यास अजून तरी ८ ते १० दिवस लागतील असं नगरपालिकेतर्फे सांगण्यात आलंय.
लवकरच सुरक्षित अशा वातावरणात याच टेबललॅन्ड वर पर्यटकांना सुरक्षित घोडा गाडी आणि घोडे सफारीचा आनंद घेता येणार आहे.