मोठ्या फुग्यात बसून हवेतून पाहायला मिळतंय बदलापूर शहर!
एका `ऍडव्हेंचर कॅम्प`मध्ये ही संधी बदलापूरकरांसाठी उपलब्ध झालीय
चंद्रशेखर भूयार, झी २४ तास, बदलापूर : बदलापूरमध्ये आजपासून हॉट एअर बलूनची हवाई सफर करता येणार आहे. एका 'ऍडव्हेंचर कॅम्प'मध्ये ही संधी बदलापूरकरांसाठी उपलब्ध झालीय. बदलापूरच्या खरवई परिसरातील मैदानात हा लहान मुलांचा ऍडव्हेंचर कॅम्प सुरू झाला असून त्यात विविध साहसी खेळांचा समावेश आहे. सोबतच इथे 'हॉट एअर बलून'ची सफरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या बलूनमध्ये बसून उंचावरून बदलापूर शहर कसं दिसतं, याचा अनुभव बच्चे कंपनीसोबतच मोठ्यांनाही घेता येणार आहे. आजवर बदलापूर शहर किंवा जवळपासच्या कुठल्याही शहरात 'हॉट एअर बलून राईड' उपलब्ध नव्हती. त्यामुळे, नागरिकांना पहिल्यांदाच हॉट एअर बलूनमध्ये बसण्याचा अनुभव घेता येणार आहे.
नाताळाच्या सुट्या लागल्या असल्यानं पहिल्या दिवशीपासूनच इथे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे, ऍडव्हेंचर कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं कॅम्प आयोजक डॉ. श्रद्धा सोमण यांनी म्हटलंय.