Governor Appointed MLC Took Oath: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांचा शपथविधी आज विधान भवनामध्ये पार पडला. या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवारही अनुपस्थित होते. कोणत्याही महत्त्वाच्या नेत्याची उपस्थिती नसताना हा शपथविधी या नेत्यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या अवघ्या तीन तास आधी आमदारकीची लॉटरी लागलेले हे सात जण आहेत तरी कोण? त्यांना आमदारकी का देण्यात आली? त्यामागील कारणं काय आहेत? जाणून घेऊयात सविस्तर...


अजित पवारांच्या पक्षातील दोघे झाले आमदार


पंकज भुजबळ :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या आमदाराची शपथ घेणाऱ्यांमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा समावेश आहे. अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं आहे. स्थानिक राजकारण आणि मंत्री छगन भुजबळ यांना वारंवार डावलल्यामुळे पंकज भुजबळ यांना विधानपरिषदेचे आमदारकी देऊन छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला गेल्याचं सांगितलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते मात्र ती जागा शिंदे गटाला सोडण्यात आली. त्यानंतर राज्यसभेसाठी देखील छगन भुजबळ इच्छुक होते मात्र त्यांना डावलून सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. म्हणूनच आता त्यांच्या मुलाला ही संधी देण्यात आली आहे. 


नांदगाव विधानसभेच्या जागेवर सलग दोन वेळा विजयी झाल्याने ही जागा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल, असा दावा भुजबळ समर्थकांकडून केला जात होता. गेल्या महिन्यात शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आमदार सुहास कांदे यांच्या विधानसभेतील फेरउमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ-कांदे असा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता होती. भाजप -शिवसेना- राष्ट्रवादी या महायुतीच्या राज्यस्तरीय वरिष्ठांनी या विवादावर तोडगा म्हणून नांदगावचे माजी आमदार पंकज भुजबळ यांचा विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्तीचा मधला मार्ग काढल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघापुरता निर्माण झालेला विवाद, त्यातून बदलणारी समीकरणे, कांदे-भुजबळ विवादाला लगाम लावण्यात पक्षश्रेष्ठींना यश आल्याचं सांगितलं जात आहे. वारंवार भुजबळांना डावलल्याने पंकज भुजबळ यांची परिषदेवर वर्णी लाऊन पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.


नक्की वाचा >> आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?


इद्रिस नायकवडी :


अजित पवार गटाकडून आमदारकीची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुस्लिम चेहरा म्हणून इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे.  नायकवडी हे सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेचे माजी महापौर आहेत. ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. एकत्रित राष्ट्रवादीमध्ये असतानाही सांगलीच्या राजकारणात नायकवडी यांचा शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्याशी राजकीय संघर्ष सुरु होता. भविष्यात जयंत पाटील यांना शह देण्यासाठी अजित पवार गटाकडून नायकवडी यांना आमदारकी देण्यात आल्याचे समजते. तसेच परिषदेची एक जागा अल्पसंख्यांकांना देण्यात येईल असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. परिषदेवर मुस्मिम चेहरा देऊन तसेच जागा वाटपात विधानसभेत मिळणाऱ्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागा मुस्लिम समजला देऊन या वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे.


शिंदेंच्या शिवसेनेकडून दोघे आमदार


मनीषा कायंदे :


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा महिला चेहरा म्हणून मनीषा कायंदे यांना ओळखलं जातं.  विधान परिषद आमदार असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांची वर्णी विधान परिषदेवर लागल्याचं सांगितलं जात आहे. 


नक्की वाचा >> Election: पक्षात फूट, सत्तासंघर्ष अन्... 2019 मध्ये जिंकलेल्या जागा अन् आता कोणाकडे किती जागा?


हेमंत पाटील :


शिवसेनेचे माजी खासदार असलेल्या हेमंत पाटील यांनीही विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे. भावना गवळी यांच्याप्रमाणे लोकसभेत उमेदवारी डावलल्यामुळे पुन्हा राजकीय पुनर्वसन म्हणून त्यांना ही संधी देण्यात आली आहे. 


भाजपाकडून 3 नव्या चेहऱ्यांना संधी


चित्रा वाघ :


चित्रा वाघ यांनी आमदाराकीची शपथ घेतली. चित्रा वाघ या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. अनेक वर्षांपासून विधान परिषदेसाठी चर्चेतील नाव मात्र प्रत्येक वेळी त्यांची संधी हुकली होती. महिला प्रश्नानांवर सातत्याने आवाज उठवणारा चेहरा म्हणून चित्रा वाघ प्रसिद्ध आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तत्कालीन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात प्रमुख भूमिका चित्रा वाघ यांनी बजावली होती.


विक्रांत पाटील : 


चित्रा वाघ यांच्याबरोबरच भाजपाच्या विक्रांत पाटील यांनीही आमदारकीची शपथ घेतली. भाजपच्या युवा मोर्चातलं महत्त्वाचं नाव म्हणून विक्रांत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या ते भाजपचे प्रदेशचे सरचिटणीस आहेत. पनवेलमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. विक्रांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय आहेत. 


महंत बाबूसिंह महाराज :


भाजपाकडून आमदारकीची शपथ घेणारं तिसरं नाव आहे, महंत बाबूसिंह महाराज! विदर्भातील पोहरादेवी या बंजारा समाजाच्या धार्मिक संस्थानाचे महंत आहेत. बंजारा समाजाची मतं आपल्याकडे खेचून आणण्यासाठी महंत बाबूसिंह महाराज यांना भाजपने आमदारकी दिल्याचं सांगितलं जात आहे. विदर्भात पक्षाची होणारी पिछेहाट टाळण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न समजला जात आहे.