Maharashtra Vidhan Sabha Election Seats: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची दुपारी साडेतीननंतर घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होणार असतानाच मागील पाच वर्षामध्ये राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींमध्ये नवीन आघाडी, युती स्थापन झाली. दोन मोठे पक्ष फुटले, बरंच पाणी पुलाखालून गेलं असून 2019 च्या निकालानंतर कोण किती जागा जिंकलं होतं आणि सध्या काय स्थिती आहे हे पाहूयात...
भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेच्या एकसंघ शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली होती. भाजपाने 164 जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेनं 124 जागा लढवलेल्या. तर या युतीसमोर आघाडीमध्ये काँग्रेस आणि त्यावेळीची एकसंघ राष्ट्रवादीने निवडणूक लढवलेली. काँग्रेसने 147 जागा लढवलेल्या आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 121 जागांवर निवडणूक लढली होती.
भाजपाने 164 पैकी 105 जागा जिंकल्या. शिवसेनेनं 124 पैकी 56 जागांवर विजय मिळवला या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 144 चा आकडा गाठत बहुमत मिळवलं होतं. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद झाले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या 121 जागांपैकी 54 जागा जिंकल्या. काँग्रेसने 147 पैकी 44 जागांवर विजय मिळवला. बहुजन विकास आघाडीने 2, एमआयएमने 2, स्वाभिमानी पक्षाने 2, समाजवादी पक्षाने 2 आणि प्रहार जनशक्ती पक्षाने 2 जागा जिंकल्या. मनसे, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली. तसेच जन सुराज्य पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्षानेही प्रत्येकी एक जागा जिंकली. 13 अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली.
भाजपाबरोबर मतभेद झाल्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीने शरद पवारांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीकडे त्यावेळी 154 जागा होता. सत्ता स्थापनेसाठी 288 च्या अर्ध्या म्हणजेच 144 किंवा त्याहून अधिक जागांची गरज असते. मात्र 27 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं सरकार अर्ध्या कार्यकाळ झाल्यानंतरच पडलं. याला कारण ठरलं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी पुकारलेलं बंड आणि त्यामुळे शिवसेनेत पडलेली फूट.
नक्की वाचा >> आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?
तत्कालीन नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे 20 जून 2022 रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नॉट रिलेचबल झाले. त्यानंतर पुढील नाट्यमय घडामोडींनंतर 30 जून रोजी त्यांनी भाजपाच्या समर्थनासहीत सत्ता स्थापन करत थेट मुख्यमंत्रिपद मिळवलं. शिंदेंबरोबर काही आमदार बंड करुन सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. बघता बघता काही दिवसांतच शिंदेंच्या बाजूने 40 आमदार गुवाहाटीत जमले. या 40 आमदारांबरोबरच अन्य आमदारांच्या पाठिंब्याच्या आधारे सत्ता स्थापन केली. 30 जून रोजी सकाळी 11 वाजता ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होणं अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 40 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने 114 आमदारांची संख्या असल्याने थेट राजीनामा दिला. त्यामुळे बहुमत चाचणीऐवजी थेट देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार, हे स्पष्ट झालं होतं. मात्र यात ट्विस्ट पाहयाला मिळाला आणि शिंदे मुख्यमंत्री झाले.
शिवसेना फुटल्यानंतर 2023 मध्ये 2 जुलै रोजी अजित पवार यांनी आपल्या 8 सहकाऱ्यांसहीत थेट महायुतीमध्ये सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. 172 आमदार संख्या असतानाही अजित पवार गटाला सत्तेत समावून घेण्यात आलं. अजित पवारांना 53 आमदारांपैकी 33 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर शरद पवारांच्या बाजूने केवळ 19 आमदार राहिले.
सध्याची स्थिती पाहता महायुतीच्या तीन प्रमुख घटक पक्षांकडे 178 हून अधिक आमदार आहेत. तर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांकडे एकूण 75 आमदार आहेत.