नवीन वर्षात नेमकं काय घडणार?
येत्या सोमवारपासून २०१८ या नूतन वर्षाचा प्रारंभ होत आहे.
मुंबई : येत्या सोमवारपासून २०१८ या नूतन वर्षाचा प्रारंभ होत आहे.
या नूतन वर्षात काय घडणार आहे याची माहिती पंचांगकर्ते खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. नवीन वर्षात पंचागानुसार काय बदल असणार किंवा २०१८ हे वर्ष लीप वर्ष आहे की नाही याची सगळी माहिती यामध्ये देण्यात आली आहे?
असं असणार नव वर्ष २०१८?
1) नूतन वर्षात गुढीपाडवा आणि रामनवमी या दोनच सुट्ट्या रविवारी आल्याने चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ होणार आहे. सन २०१८ हे लीपवर्ष नसल्याने या वर्षात ३६५ दिवस आले आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०१७ रोजी लीप सेकंदही पाळण्यात येणार नसल्याने २०१८ हे वर्ष रात्री ठीक १२ वाजता सुरू होणार आहे.
2) सन २०१८ मध्ये तीन सूर्यग्रहणे व दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार असली तरी त्यातील दोन खग्रास चंद्रग्रहणे ३१ जानेवारी व २७ जुलै या दिवशी भारतातून दिसणार आहेत. ३१ जानेवारी रोजी खग्रास स्थितीतच चंद्रोदय होताना दिसणार असल्याने छायाचित्रकाराना ती एक मोठी पर्वणी असणार आहे.
3) ३१ जानेवारी रोजी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ तीन लक्ष अठ्ठावन्न हजार किलोमीटर अंतरावर येणार असल्याने ‘ सुपरमून ‘ दिसणार आहे.
4) वर्षारंभी १ जानेवारीलाही पौर्णिमेच्या वेळी चंद्र पृथ्वीच्याजवळ तीन लक्ष छपन्न हजार कि.मीटर अंतरावर येणार असल्याने ‘ सुपरमून ‘ दिसणार आहे. जानेवारी २०१८ मध्ये दोन पौर्णिमा येत असल्याने ३१ जानेवारीच्या चंद्राला’ ब्ल्यू मून ‘ म्हणण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ जानेवारीला रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात चंद्र पहायला विसरू नका. ग्रहणाची खग्रास स्थिती, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा त्रिवेणी योग या दिवशी असणार आहे.
5) नूतनवर्षी दरवर्षींप्रमाणे ४ जानेवारी रोजी भूतप तारकासंघातून, २२ एप्रिल रोजी स्वरमंडल तारकासंमूहातून, ५ मे रोजी कुंभ राशीतून, २० जून रोजी भुजंगधारी तारकासमूहातून, २८ जुलै रोजी कुंभ राशीतून, १२ आगस्ट रोजी यांतील तारकासंघातून, २२ आक्टोबर रोजी मृग नक्षत्रातून, १७ नोव्हेंबर रोजी सिंह राशीतून आणि १३ डिसेंबर रोजी मिथुन राशीतून उल्कावर्षाव होणार आहे.
6) सन २०१८ मध्ये ३१ जुलै रोजी मंगळ ,१० मे रोजी गुरू , २७ आक्टोबर रोजी शुक्र आणि २७ जून रोजी शनी पृथ्वीच्याजवळ येणार आहेत.
7) सुवर्ण खरेदी करणारांसाठी सन २०१८ मध्ये ९ आगस्ट,६ सप्टेंबर आणि ४ आक्टोबर असे तीन गुरूपुष्ययोग येत आहेत.
8) नूतन वर्षी गणेशभक्तांसाठी ३ एप्रिल, ३१ जुलै आणि २५ डिसेंबर अशा तीन अंगारकी चतुर्थी येत आहेत.
9) सन २०१८ मध्ये १६ मे ते १३ जून या कालात ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने वटपौर्णिमेपासून सर्व सण सुमारे वीस दिवस उशीरा येणार आहेत.
10) नूतन वर्षी विवाहेच्छुकाना विवाहमुहूर्तांसठी थोडी धावपळ करावी लागणार आहे. जानेवारी, आगस्ट, सप्टेंबर,आक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यात विवाह मुहूर्त असणार नाहीत.
11) २०१८ हे वर्ष श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचे आहे. १५ आक्टोबर १९१८ रोजी विजया दशमीच्या दिवशी श्रीसाईबाबानी समाधी घेतली. नूतन वर्षी १८ आक्टोबर २०१८ रोजी विजयादशमीच्या दिवशी शताब्दी दिन येत आहेअसेही श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.