Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, तो वाघनखांनी... वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची निशाणी आहे. सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ही वाघनखं मायदेशी परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम 29 सप्टेंबरला लंडनला जाणार आहे. ज्यादिवशी शिवरायांनी अफझलखानाचा वध घेतला, त्याचदिवशी हा ऐतिहासिक, अमूल्य ठेवा मुंबईत आणण्यासाठी सरकार ब्रिटनसोबत सामंजस्य करार करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  या वाघनखांसोबत छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवारही भारतात आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुनगंटीवारांनी झी २४ तासला सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा ज्या वाघनखांनी वध केला ती वाघनखे ब्रिटिश प्रशासनाने भारताला सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे. लवकरच दोन्ही देशांमध्ये करार होणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं लंडनला कशी गेली, त्याचा इतिहास पाहूया...


वाघनखं लंडनला कशी गेली?


शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक असलेली वाघनखं ही महाराजांच्या साताऱ्याच्या वारसदारांकडं  होती. 1818 पर्यंत इंग्रजांनी संपूर्ण भारत खंगाळून टाकला होता. 1818 मध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटीश अधिकारी जेम्स ग्रँड डफ राजकीय हस्तक म्हणून साताऱ्याला काम करत होता. महाराजांचे तत्कालीन वारसदार प्रतापसिंह महाराजांनी ही वाघनखं डफला भेट दिली. डफने सातारा येथे 1818 ते 1824 या काळात काम केलं. 1824 मध्ये डफ वाघनखं घेऊन ब्रिटनला परतला. मात्र, डफच्या वारसदारांनी ही वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये ठेवायला दिली.



दरम्यान, जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर वाघनखं यावर्षीच पुन्हा महाराष्ट्रात परत येतील. आम्हाला युके प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत करण्यास तयार असल्याचं पत्र मिळालं आहे. हिंदू कॅलेंडप्रमाणे ज्या दिवशी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता, त्या दिवशीच ही वाघनखं परत आणली जातील. याशिवाय इतर तारखांचाही विचार केला जात आहे. तसंच वाघनखं भारतात परत कशी आणायची यावरही चर्चा सुरु आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. वाघनखं परत आणण्यासाठी तीनजणांचं पथक लंडनला जाणार आहे. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासह संस्कृती विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गार्गे यांचा समावेश आहे.