श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : नियमित पावसामुळं आधीच हैराण झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुसद विभागातील ऊस, सोयाबीन, कापूस, ज्वारी ही पिके हुमणीच्या हल्ल्याला बळी पडली आहेत. मोठ्या कष्टाने जगवलेली पीकं जळू लागली आहेत. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करत आहेत मात्र हुमणी आळी त्याला दाद देत  नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 


शेतकरी गोंधळात


यवतमाळ जिल्ह्यातील पार्डी गावचे रहिवासी असलेल्या अरुण ढेकळे यांचा चार एकरातील ऊस जळून गेला आहे. उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ६ ते ८ फूट वाढलेला ऊस नष्ट झालाय. खरं तर हुमणीचा प्रादुर्भाव झालाय हे कळण्यापूर्वीच त्यांचं पीक उद्ध्वस्त झालंय. त्यांच्या ऊसाच्या शेतात पहिल्यांदाच हुमणीचा प्रादुर्भाव झालाय.


अरुण ढेकळे या शेतकऱ्याला ऊसाचे ७० टन उत्पादन अपेक्षीत होते. मात्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे त्यांचं स्वप्न भंगलंय. अशीच अवस्था अनुज इंगोले या शेतकऱ्याची झालीय. हुमणीचा बिमोड करण्यासाठी त्यांनी महागडी औषधी फवारली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. 


ऊस, भुईमूग, सोयाबीन या पिकावर सध्या कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडीबाबात माहिती नसल्यामुळे शेतकरी गोंधळला आहे. किडीमुळे खरीप पिकाची वाढ खुंटली आहे. वरवर बघता किड दिसत नाही. मात्र, रोप उपटल्यानंतर मुळाशी कीड दिसून येते.


कृषी तज्ज्ञांचा सल्ला


व्यवस्थित न कुजलेलं शेणखत शेतात टाकल्यास हुमणीचा प्रादुर्भाव होतो. मॉन्सूनपूर्व  ६० ते ७० मि.मी. पाऊस  पडल्यास हुमणीचे भुंगे जमिनीतून बाहेर पडतात आणि जवळच्या झाडांवर आश्रय घेतात.


हुमणीची एक मादी साधारणपणे ५० ते ६० अंडी घालते. हुमणीची अळी प्रथम सेंद्रिय पदार्थ खाते, नंतर ती पिकाच्या मुळांचा फड़शा पाडते. ही कीड जास्त काळ जमिनीखाली लपून रहाते. हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी  शेतकऱ्यांनी 'फोरेट' हे औषध जमिनीतून देण्याची आवश्यकता असते. तसेच मेटारायझीम आणि अॅनिसोप्लो या बुरशीनाशकांचा वापर करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला. 


पावसाच्या लहरिपणाचा विपरित  परिणाम यवतमाळ जिल्ह्यातील खरीप पिकांवर झाला असून शेतक-यांनी वेळीच  कीड आणि रोगांवर उपाय करण्याची आश्यकता आहे.अन्यथा खरीप पीक हातचं जाण्यची शक्यता नाकारता येत नाही.