Akola Double Murder Case: दुहेरी हत्याकांडाने अकोला शहर हादरले आहे. एकाच महिन्यातील दुहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पतीने आपल्याच पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीने वार करत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. (Crime News In Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संतोषी माता मंदिराजवळ एका घरात पतीने आपल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर आई व मुलीचा अशारितीने मृत्यू झाल्याने परिसरातून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनीष म्हात्रे असं आरोपीचे नाव आहे. तर, रश्मी म्हात्रे व माही म्हात्रे असं मृतक मुलीचं व पत्नीचे नाव आहे. 


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी वाद-विवाद सुरू असायचे. या रोजच्या वादाला वैतागून आरोपीने आज रागाच्या भरात पत्नी व मुलीवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी हे वेगळे राहत होते. पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याने तिला मनवण्याचा अनेकदा प्रयत्न केला तो तिच्या माहेरीदेखील जायचा. परंतु पत्नी काही नांदायला जायची नाही. मंगळवारी म्हात्रे कुटुंबाकडे लग्न असल्यामुळं पत्नी मुलीसह अकोल्यात आली होती. तेव्हा आरोपीने तिला सासरी राहण्यासाठी सांगितलं होतं. मात्र तिने नकार दिला. 


पत्नीने पुन्हा सासरी नांदायला नकार दिल्याने आरोपी बिथरला. त्याच्या मनात राग खदखदत होता. 24 एप्रिलला पहाटे 5 वाजताच्या सुमारास दोघीही साखरझोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. यात त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या. दुर्दैवाने दोघींचाही मृत्यू झाला आहे. हत्येचा गुन्हा घडताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत. 


दरम्यान, अकोल्यात एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दुहेरी हत्याकाडांची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुणांची हत्या करण्यात आली होती. क्षुल्लक कराणावरुन तिघा आरोपींनी या दोघींची हत्या केली होती. धारदार शस्त्राने वार करत दोघांचाही खून करण्यात आला होता. पोलिसांनी 24 तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली आहे.