चंद्रकांत पाटील यांच्या सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावर पती सदानंद सुळे यांचा संताप
Sadanand Sule On Chandrakant Patil : भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महिलांचा अपमान केला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनी टीका केली आहे.
मुंबई : Sadanand Sule On Chandrakant Patil : भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महिलांचा अपमान केला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनी टीका केली आहे. सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आपला संताप व्यक्त केला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. त्यावरुन सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भाषेवरुन भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
सदानंद सुळे पाहा काय म्हणाले?
हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष ! ते सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होते, हे स्त्री द्वेषी आहेत. जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे. ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे, असे सदानंद सुळे म्हणाले.
'सुप्रिया सुळे, घरी जा आणि स्वंयपाक करा'
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. तुम्ही कशाला राजकारणात राहता, घरी जा आणि स्वंयपाक करा, खासदार आहात ना तुम्ही ! कळत नाही का ? एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही का ?, एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झाली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती. आता त्या टिकेला सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी प्रत्युत्तर दिलेय. त्यांनी याबाबत ट्विट केलेय.
तसेच 'तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, पण शोध घ्या आणि आरक्षण द्या' अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. ओबीसी आरक्षणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांमध्ये टीका सुरु आहे.