नागपूर: देशात आणीबाणी लागली आणि आमचा राजकीय प्रवास सुरू झाला. जर आणीबाणी लागली नसती तर आम्ही राजकारणामध्ये आलो नसतो. त्यामुळे मी देशातील आणीबाणीचे प्रॉडक्ट असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री व नागपूरचे भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी केले. नितीन गडकरी यांच्या महाविद्यालयीन आणि सुरुवातीच्या राजकीय जीवनातील मित्र आणि साथीदारांच्या वतीने नागपुरात 'नितीन गडकरी, दोस्तों के बीच' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला. महाविद्यालयात गेल्यानंतर पहिल्याच वर्षात देशात आणीबाणी लागू झाली. त्यावेळी सगळेच सरकारच्या बाजूने बोलत होते. मात्र आम्ही आंदोलने व लाठ्या खाल्ल्या. सहकाऱ्याच्या स्कूटरवरुन फिरुन अर्धा कप चहा घ्यायचो, असे गडकरी यांनी सांगितले. हल्ली राजकारण म्हणजे काळी-पिवळी टॅक्सी झालीय. कुणीही कुठे जातंय. पक्षात कोण येतं, का पक्ष सोडतोय, हे कुणाला काही माहित नाही. विचारधारेबाबत असलेली एकनिष्ठता कमी होत चाललेय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी भाजपमधील हिंमत असलेला एकमेव नेता- राहुल गांधी


नितीन गडकरी यांना भाजपने पुन्हा एकदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपमधून काँग्रेसचे नाना पटोले रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी पावणेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. यानंतर गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी आपल्या कामाने या खात्याची प्रतिमा उंचावली होती. पाच वर्षांमध्ये ७० हजार कोटी रुपयांची विकासकामे झाल्याचा गडकरी यांचा दावा आहे. मध्यंतरीच्या काळात पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावासाठी चर्चा सुरु झाली होती. भाजपला बहुमत न मिळाल्यास घटकपक्षांना एकत्र आणताना नरेंद्र मोदी अडसर ठरू शकतात. अशावेळी सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध राखून असलेले नितीन गडकरी यांचे नेतृत्व स्वीकारार्ह असेल, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेकांकडून मांडण्यात आली होती.