`कोणता देव मानावा हे...`; देवी सरस्वतीबाबत केलेल्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण
कधी पाहिलं नाही त्यांची पूजा का करायची असा सवाल छगन भुजबळ यांनी केला होता
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या एका वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. देवी सरस्वती (saraswati) आणि देवी शारदेच्या फोटोवरुन छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये (school) सरस्वती (saraswati) आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो (Photo) लावले पाहिजेत असं विधान केले होते.
सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी हे वक्तव्य केले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना माझ्या वक्तव्यावर मी अजूनही ठाम असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलंय. (I still stand by my statement Chhagan Bhujbal explanation ABN)
"समता परिषदेच्या व्यासपीठावर माझ्या कार्यकर्त्यांसमोर मत मांडण्याचा मला अधिकार आहे. देव कुणाला मानावे आणि कुणाची पूजा करावी याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुठलाही माफी मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मी स्वतः माझ्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो. सप्तशृंगी कोटमगाव देवीच्या दर्शनालाही जातो. मात्र कोणता देव मानावा आणि कोणाची पूजा करावी हे माझे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा या वक्तव्याशी संबंध नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये," असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?
“शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.