अहमदनगर: महाविकासआघाडीतील कुरबुरी अशाच सुरु राहिल्या तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, असा खळबळजनक दावा माजी खासदार आणि राज्यातील ज्येष्ठ नेते यशवंतरावर गडाख यांनी केला. ते रविवारी नेवासे येथे शंकरराव गडाख यांच्या सत्कार समारोहाप्रसंगी बोलत होते. यावेळी यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चांगलेच कान टोचले. त्यांनी म्हटले की, अनेक राजकीय तडजोडी करून तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, मंत्रिपद आणि बंगल्यांच्या वाटपावरून रोज कोणी ना कोणी रुसत आहे. उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला नसता तर काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसावे लागले असते. आताही तुम्ही सुधारला नाहीत तर उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, असे भाकीत यशवंतराव गडाख यांनी वर्तविले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या शंकरराव गडाख यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद देण्यात आले होते. यानिमित्ताने नेवासे येथे त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशवंतराव गडाख यांनी केलेल्या जोरदार फटकेबाजीने राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली आहे. यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना यावेळी चांगलेच धारेवर धरले. 


राज्यात तीन पक्षांचे सरकार टिकेल का, असा प्रश्न मी बाळासाहेब थोरात यांना विचारला होता. त्यावर थोरातांनी 'आता सरकार स्थापन केलेय खरे, पण आता पाहू', असे उत्तर दिले होते. त्यावेळी मी त्यांना म्हटले की, दररोज कोणत्यातरी पक्षाचा नेता रुसत आहे. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला नसता तर तुम्ही विरोधी बाकांवरच तोंडाची हवा सोडत बसला असता. मात्र, आता तुम्ही मंत्री झाला आहात. शहरी भागाचे सरकार जाऊन ग्रामीण भागाचे सरकार आले आहे. ग्रामीण भागातील प्रश्न सोडवायला थाटमाट कशाला हवाय? उद्धव ठाकरे यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य कायम ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भांडणे कमी करावीत, असा सल्ला यावेळी यशवंतराव गडाख यांनी दिला.