अलिबाग : संपादीत केलेल्‍या जमिनीचा मोबदला दिला नाही म्‍हणून रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयावर जप्‍तीची नामुष्‍की आली होती. मात्र अर्जदारांनी १५ दिवसांची मुदत मान्‍य केल्‍यामुळे ही नामुष्‍की तात्‍पुरती टळली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्दुल रहेमान फते महंमद मर्चंट यांची पनवेल तालुक्यातील तळोजा येथील सव्‍वापाच गुंठे जमीन सिडकोसाठी रायगड जिल्हाधिकारी भूसंपादन विभागामार्फत १९८७ साली भूसंपादन केली होती. 


मात्र २०१८ उजाडलं तरी मर्चंट यांना जमिनिचा मोबदला मिळाला नाही. यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली असता दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ लाख ६ हजार ८१८  रुपये १५  टक्के वार्षिक व्याजदराने द्यावे किंवा संगणक सर्व्‍हर जप्‍त करावे असे आदेश काढले. 


जप्‍तीचे वॉरंट घेवून बेलीफ जिल्‍हाधिकारी कार्यालयात पोहोचताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.  अखेर १५ दिवसात सिडकोकडून मोबदला मिळवून देणार असल्याचे उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे यांनी लिहून दिल्यानंतर जप्तीची नामुष्की तात्‍पुरती टळली आहे.