निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू जप्त, उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी
२८८ देशी दारूच्या बाटल्या जप्त
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूचा पूर लातूर जिल्ह्यात वाहत आहे. लातूरमध्ये दोन ठिकाणी लातूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. पहिल्या कारवाईत अहमदपूर तालुक्यातील नागझरी शिवारात एका चार चाकी गाडीतून २८८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
यावेळी उत्पादन शुल्क पथकाने १२ किमी गाडीचा पाठलाग करून जवळपास १८० मिली दारू जप्त केली. तर दुसऱ्या एका कारवाईत निलंगा तालुक्यातील कोराळवाडी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत रसायन मिश्रित हातभट्टीची दारू आणि रसायन नष्ट करण्यात आली.
यात ४ हजार ६१० लिटर रसायन तर ९० लिटर हातभट्टीची रसायनमिश्रित दारू जप्त करण्यात आली. यावेळी निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, इतरही अधिकारी कर्मचारी आणि कर्नाटक उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कर्मचारीदेखील उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील वरळी मतदार संघातही शनिवारी संध्याकाळी एका टेम्पोमध्ये चार कोटी ३० लाख रुपयांची रोकड सापडली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने धाड टाकून हा टेम्पो ताब्यात घेतला. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात २१ कोटी रुपयांची दारुही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.