कोकणातील आयलॉग प्रकल्पाला विरोध असताना जनसुनावणी रेटून पूर्ण
राजापूरमधील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला विरोध आहे.
रत्नागिरी : राजापूरमधील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला विरोध आहे. वेत्ये, आंबोळगड, नाटे गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दाखला आहे. या प्रकल्पाची सुनावणी रेटून पूर्ण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी तीन वेळा रद्द झालेली प्रस्तावित आयलॉग बंदर प्रकल्पाची जनसुनावणी जिल्हाधिकारी यांनी रेटून नेली. जनसुनावणीच्यावेळी मोठा गोंधळ झाला. लोकांचा गदारोळ आणि जिल्हाधिकारी चोर, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या गोंधळात जनसुनावणी पूर्ण झाली.
राजापूरमधील प्रस्तावित असलेल्या वेत्ये, आंबोळगड, नाटे गावात येणाऱ्या आयलॉग प्रकल्पाला होत असलेला विरोध डावलून, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिलेले आदेशाला केराची टोपली दाखवत आणि या अगोदर तीन वेळा ग्रामस्थांच्या विरोधामुळे रद्द झालेली जनसूनवणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रेटून नेली, तसा आरोप ग्रामस्थानी केला आहे. मात्र ग्रामस्थांचा विरोध रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिसलाच नाही. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जाहीर केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे इतकी मुजोरी आली कोठून असा सवाल राष्ट्रवादीने विचारलय. तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडत का नाही असा सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विचारला आहे. आमचा या प्रकल्पाला कायमच विरोध राहील असा स्थानिकांनी सांगितले आहे. खरं तर जनसुनावणी ही जनतेची मते ऐकून घेण्यासाठी असते. मात्र ही जनसुनावणी रेटूनच पुढे नेली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपण जनतेचे सेवक नसून कंपनीचे सेवक असल्याचे दाखवून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.