IMD ALERT : पुढचे चार दिवस काळजी घ्या, राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा
उष्माघाताचा धोका वाढला, दुपारच्या रखरखीत उन्हात बाहेर पडत असाल तर आधी ही बातमी वाचा
IMD Alert : राज्यात सध्या सूर्यनारायणाचा प्रकोप झाला आहे. उष्णतेने गेल्या काही वर्षातला रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विदर्भात तर उन्हाचा कहर सुरु आहे. येत्या 4 दिवसांत विदर्भामध्ये उष्ण लहरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एरवीच तापलेल्या विदर्भाला पुढील 4 दिवस उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागणार आहे.
2 मे पर्यंत तीव्र उष्ण लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात तापमान 40 ते 44 अंशांवर पोहोचलं आहे. जवळपास निम्म्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे.
जळगावमध्ये उच्चांकी तापमान
जळगाव जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता प्रचंड वाढली आहे. तापमान उच्चांकी 45.9 अंशांवर पोहचलं आहे. जळगाव जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता प्रचंड वाढली आहे. ताशी 15 किमी वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान जास्त काळ उन्हात राहिल्यास उष्माघात होण्याचा धोका वाढला आहे.
त्यामुळे या काळात बाहेर पडणे टाळावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या. जळगावात पारा सलग 43 ते 44 अंशांवर स्थिर आहे. अशातच आज तापमानात वाढ होऊन पारा 45.9 अंशांवर पोहोचला आहे.
बारामतीतही उन्हाचा कहर वाढला
बारामती शहरात आज 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढतं आहे. तापमान वाढत असल्यानं नागरिकांना हैराण झालेआहेत. नेहमी वरदळ असणारे रस्ते आज ओस पडल्याचं पहायला मिळालंय. बारामती शहरात नगरपालिकेकडुन वसुधंरा अभियाना अतंर्गत तापमानाची माहिती देणारी स्क्रिन लावण्यात आली आहे.