मुंबई: रात्रभर मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं झोडपलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनरात झालेल्या पावसानं नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. कोकणात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याची माहिती शुभांगी भुते यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 5 ते 6 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 


त्यामुळे आज आणि उद्या मुंबई, ठाणे, पालघर या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंदुदुर्गात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 19९ ते 21 जुलैदरम्यान मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 


मुंबईसह उपनगरातील पावसाचे अपडेट्स


रात्रीच्या पावसामुळे बोरिवलीकरांची त्रेधातिरपीट उडाली. एकसर भागात अचानक पाणी शिरल्याने स्थानिक त्रस्त झाले आहेत. घराघरांमध्ये चार ते पाच फूट पाणी शिरल्यानं मोठं नुकसानं झालं आहे. तर दुसरीकडे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच नुकसान झालं आहे.


मुंबईतील शिवडी भागातील घरांत दोन फुटांपर्यंत पाणी शिरलं. तर कांदीवली भागातही पाणी शिरल्यानं नुकसान झालं. समुद्राच्या भरती दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास पाण्याची पातळी आणखीन वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण आहे.


राज्यातील पावसाचे अपडेट्स


बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ, कुंबेफळ, देवळा, राडी, मुळेगाव तांडा, धानोरा, पाटोदा या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पाटोदा परिसरातील लेंडी नदीला पूर आला तर राडी परिसरातील रानोबा नदीलाही पूर आला. पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. 


रत्नागिरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टेंभे पूल भागातील सखल भागात पाणी शिरलं. पावसामुळे काजळी नदीला पूर आला आणि नदीचं पाणी आसपासच्या सखल भागात शिरलं.


राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे.