Weather update : यंदा ऊन जरा जास्तच आहे, असं मार्चच्या सुरूवातीलाच म्हणण्याची वेळ आली आहे. हे कमी होतं म्हणून की, काय आता हवामान विभागानं ऐन उन्हाळ्यात धोक्याचा इशारा दिलाय. मार्च महिन्यातील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं 4 ते 6 मार्चदरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. याशिवाय 5 आणि 6 मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातल्या तापमानात विशेष घट होत नसल्यानं तिथं कमी प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे.


आधीच शेतमालाला भाव मिळत नसल्यानं कांदा तसच धान उत्पादक संकटात आहेत. कापूस उप्तादकांची स्थितीही फारशी वेगळी नाही. त्यामुळे संभाव्य संकटाचा धोका लक्षात घेऊन शेतक-यांनी वेळीच सावध राहण्याची गरज आहे. 


  • उशिरा लागवड झालेल्या रब्बी पिकांची काढणी करुन घ्या. 

  • मळणी करणं शक्य नसल्यास, पिकं योग्यरीत्या झाकून ठेवा

  • उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी हलवा

  • जनावरं सुरक्षीत ठिकाणी बांधून ठेवा

  • पिकांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या

  • पिकांवर कीटकनाशकाची, बुरशीनाशकांची फवारणी करा


पावसाचं संकट लक्षात घेऊन धुळे आणि नंदुरबारमधील शेतक-यांनी शेतातील गहू विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलाय. त्यामुळे गव्हाची आवक वाढलीय. अशीच सतर्कता इतर शेतक-यांनीही दाखवली तर मोठं नुकसान निश्चितच टळेल.