मार्च अखेरीस विदर्भात तापमानाचा पारा चाळीशी पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
सूर्य आग ओकतोय...विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात कमालीचा बदल होत आहेत. कुठे पाऊस तर कुठे उकाड्याने हैराण व्हायची परिस्थिती आहे. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी.
हवामान विभागाकडून एक महत्त्वपूर्ण इशारा देण्यात आला आहे. मार्च अखेरीस मे महिन्या एवढं तापमान झालं आहे. राज्यभरात पुढच्या 24 तासात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्यात उष्णतेची लाट आणखी वाढणार आहे. राज्यात तापमानात तब्बल 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे. विदर्भात 28 ते 30 मार्च दरम्यान अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी 40 अंश डिग्री सेल्सियसपेक्षा तापमना गेलं आहे. सोलापूर, अहमदनगर, परभणीसोबत विदर्भात तापमानाचा पारा 40 पार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
देशात सुरुवातीला 27 मार्चला राजस्थानपासून उष्णतेची लाट सुरू होणार आहे. त्यानंतर गुजरात, मध्य प्रदेशापर्यंत उष्णतेची लाट येणार आहे. विदर्भात ही लाट उद्यापासून येत आहे.