प्रणव पोळेकर, झी मीडिया, कणकवली : तालुक्यातील जाणवली येथे बंदुकीची गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. सखाराम महादेव मेस्त्री असे मयताचे नाव आहे. रविकांत गणपत राणे उर्फ बाबू राणे याने डुकरांना हुसकवण्यासाठी गोळी बार केला होता. मात्र यातील एक गोळी ही सखाराम मेस्त्री यांच्या डोक्यात लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशयित बाबू राणे शाळेत गणपती साकारण्याचे काम करत होते. त्यावेळी दळवीवाडीत डुक्कर शेतात घुसल्याचे काही लोकांनी येऊन आरोपीला सांगितले. त्यामुळे लगबगीने आपल्याकडील शेती संरक्षणाची बंदूक घेऊन शेतीच्या परिसरात ते गेले. डुकरांना हुसकवण्यासाठी त्यांनी गोळीबार केला. मात्र यातील एक गोळी चुकून मेस्त्री यांना लागली. 


घटनेनंतर आरोपी रविकांत राणे स्वतः कणकवली पोलिसांपुढे हजर होत घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, सहा.पो.नि. बापू खरात, उपनिरीक्षक विनायक चव्हाण, राजेश उबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच प्राथमिक पाहणी केली.


दरम्यान आरोपी रविकांत राणे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात भा.दं.वि. ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.