रद्दी विकून कुष्ठरोगी, गरिबांसोबत दिवाळी साजरी; आदर्श मैत्री फाऊंडेशनचा उपक्रम
लातूरकरांना घरातील पेपरची रद्दी देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूरच्या आदर्शमैत्री फाउंडेशनतर्फे दिवाळीनिमित्त अनोखा उपक्रम घेण्यात आला. आदर्शमैत्री फाउंडेशनच्यावतीने कुष्ठरोगी, अतिशय गरीब तसेच उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यासाठी लातूरकरांना घरातील पेपरची रद्दी देण्याचे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आले.
यातून जवळपास ४० ते ५० क्विंटल रद्दी जमा झाली. त्यानंतर आलेली ही रद्दी विकून त्यात आदर्शमैत्री फाउंडेशनने आणखी काही रक्कम टाकून जवळपास ३०० जणांना दिवाळीचा फराळ तसेच अभ्यंग स्नानाच्या सामानाचे वाटप करण्यात आले.
लातूर शहरातील विवेकानंद चौकापासून जवळच असलेल्या कुष्ठधाम येथील जवळपास १०० कुष्ठरोगी कुटुंबाना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. याशिवाय बाभळगाव येथील पाल ठोकून राहणारी ७५ कुटुंबे आणि गरुड चौकातील विजयनगर येथील गरीब कुटुंबाना या दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
आदर्श मैत्री फाऊंडेशन ही विविध क्षेत्रातील तरुणांनी समाजउपयोगी कामासाठी सुरु केलेली संस्था आहे. आदर्श मैत्री फाउंडेशनने जरी हा उपक्रम राबविला असला तरी लातूरकरांनी दिलेल्या पेपर रद्दीच्या माध्यमातून वाटा उचलला असल्यामुळे, हा लातूरच्या नागरिकांचाच उपक्रम असल्याची भावना आदर्शमैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी व्यक्त केली. अशा पद्धतीने आपल्यासोबत दिवाळी साजरी केल्यामुळे कुष्ठधाममधील नागरिकांचा आनंद ओसंडून वाहत होता.