लेकिनं प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी आयुष्य संपवलं, जावयाच्या दारातच रचलं सरण
मुलीने प्रेम विवाह केला म्हणून आई वडिलांनी आत्महत्या केलीय. इगतपुरी तालुक्यात ही घटना घडली. या नंतर या दोघांवर जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले. मन सुन्न करणारी अशी ही घटना आहे.
Nashik Crime News : लेकिनं प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी आयुष्य संपवलं आणि जावयाच्या दारातच सरण रचलं आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. जावयाच्या दारात या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. जावयाच्या घराबाहेर लोकांची तुफान गर्दी झाली होती. सुरक्षा जवानांनी घटनास्थळी धाव घेत या गर्दीवर नियंत्रण मिळवले.
मुलीने प्रेम विवाह केल्यामुळे आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. रविवारी इगतपुरी तालुक्यातील भरविर या परिसरात ही घटना घडली होती. इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथील 49 वर्षीय निवृत्ती किसन खातळे आणि त्यांची पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे अशी मृत पती पत्नीची नावे आहेत.
मुलीने प्रेमविवाह केल्याने उचलले टोकाचे पाऊल
मुलीने प्रेमविवाह केल्याने समाजात आता तोंड दाखवायला जागा राहिली नसल्याने निराश अवस्थेत त्यांनी हे कृत्य केले. मात्र, गावातील तरुणांनी आणि त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी आज दोन्हीही मृतदेह मुलाच्या घरासमोरच जाळून अंत्यसंस्कार केले. अशा प्रकारे अंत्यसंस्कार करत त्यांनी प्रेम विवाह केलेल्या दोघांचाही निषेध केला. इगतपुरी तालुक्यातील भरविर या परिसरात परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलिसांचं मोठं पथक तैनात करण्यात आलेल होते.
जुनाट मानसिकतेतून संपवलं आयुष्य
भरवीर बुद्रुक येथील या पती पत्नीने मुलीने प्रेमविवाह केल्याच्या जुनाट मानसिकतेतून रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. देवळाली कँम्प पोलीस ठाण्याच्या हद्धीत ही दुर्दैवी घटना घडली. नेमके कारण कळाले नसून आरपीएफचे पाेलिस निरीक्षक महेश कुलकर्णी व पथक दाखल झाले. त्यांनी घटनेबद्दल शाेक व्यक्त करत कायदेशिर प्रक्रिया केली. रात्री उशिरापर्यंत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरूणाला मारहाण
पंढरपूरमधल्या माढा तालुक्यातील महातपुर गावात मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरूणाला मारहाण करण्यात आली होती. मुलीच्या नातेवाईकांनी लोखंडी रॉडने तरूणाला मारहाण केली होती. माढा पोलिसांत मुलीच्या वडिलांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
भावानंच आपल्या भावोजीची हत्या केली
आंतरधर्मीय प्रेमविवाहातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. नंदुरबार शहरातील वर्दळीच्या भागातली ही घटना होती. बहिणीला पळवून नेऊन विवाह केल्याच्या रागातून, तिच्या भावानंच आपल्या भावोजीची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाच वातावरण होतं.