नागपूर : पोलीस विभागातून मुदत-पूर्व निवृत्ती घेत चोरीच्या व्यवसायाला पसंती देणाऱ्या एका शिपायाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंडांच्या एका स्थानिक टोळीचा सक्रिय सदस्य असलेला या माजी पोलीस शिपायाला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या त्याच्या साथीदारावर तब्बल ८० गुन्हे नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यांच्याकडून २ देशी कट्टे आणि ३ जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली. 


४७ वर्षाच्या विनोद मोहोडने पोलीस विभागात सुमारे २ दशक नोकरी केली. पण २० वर्षे पोलीस विभागात नोकरी केल्यानंतर या शिपायाने स्वेच्छा निवृत्तीचा स्वीकार करत त्याने नंतर चोरी-दरोडेखोरीचा मार्ग स्वीकारला. नोकरीत असताना त्याचा अनेक गुन्हेगारांशी संबंध आला आणि हा मार्ग स्वीकारण्याचा त्याने निश्चय केला आणि एका स्थानिक टोळीचा तो सदस्य झाला.


नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान शहराच्या धरमपेठ भागात दोघे संशयीत परिस्थितीत आढळले. त्यांना हटकले असता दोघांनी पाळायचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत त्यांच्यापैकी सत्या उर्फ सतीश चन्ने या तडीपार आरोपीला अटक केली तर दुसरा फरार झाला. 


सत्याकडून पोलिसांना एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले. सत्यावर दरोडे, चोरी, मारहाण, लूटमार असे नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यात एकूण तब्बल ८० गुन्हे दाखल आहेत. तो तडीपार देखील होता. त्याची चौकशी केली असता त्याने इतर ३ साथीदारांबाद्द्ल माहिती दिली. 


पोलिसांनी कारवाई करत शहराच्या गोपाळ नगर भागात राहणाऱ्या ४७ वर्षाच्या विनोद मोहोडला अटक केली. त्याच्याकडून १ आणखी देशी कट्टा आणि २ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केली. या टोळीतील सेवक मसराम आणि बंटी मेश्राम हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विरोधी टोळीतीळ एका सदस्याचा `गेम' करण्याच्या तयारीत हि टोळी होती. 


सुमारे २० वर्ष गुन्हेगारांशी दोन हात केल्यावरही एका पोलीस शिपायाला गुन्हेगारी विश्वात सक्रिय झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.