सातारा : राज्य शासन साहित्य संमेलनावर लाखो रुपये खर्च करत असताना मात्र ग्रामीण भागातील लेखक दुर्लक्षित झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शंकर कवळे या मातंग समाजातील लेखकाला आज घरातील दोनवेळची चूल पेटविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबावं लागतंय. जगाला माणुसकीची किंमत शिकविणाऱ्या या साहित्यिकाला मदतीची गरज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराड तालुक्यातील मरळी हे छोटं गाव. खंडोबाच्या पाली या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे. या गावात शंकर दिनकर कवळे यांचा जन्म झाला. वडील दिनकर हे दोरखंड वळायचे काम करत तर आई शकुंतला शेतमजुरी करायची. पाच भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार. एक गुंठा जमीन नाही. गरिबी पाचवीला पुजलेली; पण शंकर यांना शिकायचं होतं. आर्थिक परिस्थितीशी झगडत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि शेवटी परिस्थिती पुढे हार पत्करली. 


मोठ्या भावाने आणलेली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बाबा कदम यांची पुस्तके ते डोंगरात बसून वाचू लागले आणि हीच पुस्तके त्यांच्या लेखणीला प्रेरणादायी ठरली. हुंडाविरोधी ‘आरती’, प्रेम कसे असावे सांगणारी ‘अनुराग’ आणि ग्रामीण भागातील वास्तव सांगणारी ‘बिजली’ या तीन कादंब-या त्यांनी लिहिल्या.  ‘माणुसकीचा मोठेपणा, खरा माणूस, बुद्धिमान बिरबल’ हे कथासंग्रह आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र त्यांनी लिहिले.


शंकर कवळे हे आज दहा बाय दहाच्या खोलीत राहतात. पत्नी पूनम या दुस-याच्या शेतात मजुरी करतात. शंकररावांची मुलगी कादंबरी सातवीत शिकतेय आणि मुलगा विश्वम हा दीड वर्षाचा आहे. आजारी मुलीला दवाखान्यात नेण्यासाठीही पुरेसे पैसे या लेखकाकडे नाहीत. अजून खूप लिहायचं आहे, पण सर्व वेळ जगण्यासाठीच्या धडपडीत जातोय, असं शंकर कवळे सांगतात.


कवळे यांच्या 'माणुसकीतील मोठेपण' या कथा संग्रहातील लेख सातवीच्या  पाठ्यपुस्तकात आहे. सरकारनं अशा गरिब लेखकाला मदत करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात.या साहित्यिक हिऱ्याची लेखणी पुन्हा परजण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना आणि वाचकांकडून आर्थिक मदतीचा हात मिळण्याची गरज आहे.