एकीच्या बळाचा दुरुपयोग; संभाजीनगरच्या जेलमध्येच तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांकडून बेदम मारहाण
संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांनी चोपून काढले आहे.
Sambhaji Nagar Crime News : कारागृहात कार्यरत असलेल्या कैद्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घडली आहे. संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. यात हे अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारामुलळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात मारहाणाची हा प्रकार घडला आहे. येथे कैद असलेल्या नऊ कैद्यांनी मिळून 2 तुरुंग अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या 9 आरोपींनी दोन्ही अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि लाथा बुक्क्याने जबर मारहाण केली. मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस तक्रार केली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या या 9 कैद्यांविरोधात आता विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, कैदी एकत्र येत जेलमध्येच अधिकाऱ्यांना मारत असतील तर जेलमध्ये आता अधिकारी तरी सुरक्षित आहेत का? तुरुंगाच्या शिस्तीचं काय? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
बँक कर्मचा-याच्या घरात गोळीबार
छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्ज वितरण करणा-या एका खासगी बँकेतील कर्मचा-याच्या घरात गोळीबार झाला. या गोळीबारात बँक कर्मचा-याचा अडीच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झालाय. गंगापूर शहरातील अहिल्यादेवी नगरात ही घटना घडलीये. हा गोळीबार एका गावठी कट्टयातून करण्यात आला असून घरात दोन गोळ्या फायर करण्यात आल्यात. हा गोळीबार कोणी केला, कर्मचा-याकडे गावठी कट्टा कुठून आला याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसानेच चोरली बाईक
संभाजीनगरच्या गुलमंडी परिसरात पोलीस बाईक नेताना सीसीटीव्हीत चित्रित झाले होते.दुकानाबाहेर पार्क केलेली बाईक पोलीस नेताना स्पष्ट दिसत होते.सिटी चौक पोलीस ठाण्यातील पेट्रोलिंग करणा-या पोलिसांनी ही बाईक चोरल्याचा आरोप करण्यात आला. पेट्रोलिंग करणारी व्हॅन आली. त्यातून एक पोलीस कर्मचारी उतरला. रस्त्यावर पार्क असणा-या एका बाईकची त्यानं पाहणी केली. मग त्यानं तिथूनच जवळ पार्क केलेल्या आणखी एका कारची आणि स्कूटरची पाहणी केली. त्यानंतर तो पोलीस कर्मचारी पुन्हा पहिल्या बाईकजवळ गेला. तोपर्यंत पोलिसांच्या व्हॅन मधला आणखी एक पोलीस कर्मचारी उतरला आणि दोघांनी मिळून बाईक सुरू करण्याचा प्रयत्न केला. दहा मिनिटं बाईक सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र बाईक सुरू झाली नाही. तरीही पोलिसांच्या व्हॅनला धरुन पोलिसांनी बाईक नेली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सगळा बाईक चोरीचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता.