किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांतल्या घटनांनी पोलीस चक्रावलेत. गेल्या काही दिवसांत आत्महत्यांची संख्या वाढली आहे. नाशिकरोडला रेल्वेगाडीखाली एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केलीय. म्हसरूळला महिलेनं सिलींग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. अंबडमधील तरूणाने विष पिऊन जीवन संपवलं. अशा आणखी काही घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यात तरूणांची संख्या अधिक आहे. शहरात दिवसाला कुठल्या ना कुठल्या भागात एक ते दोन आत्महत्या होतच आहेत. महिन्याभरात आत्महत्यांचा वाढलेला आकडा पाहून पोलीसही चक्रावून गेलेत. 


शहरात १ जानेवारीपासून तब्बल ३० जणांनी जीवन संपवलं. त्यात गळफास घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. २०१९ मध्येही वर्षभरात तब्बल १०० हून अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. एकाकीपण, नैराश्य, कृत्रिम सौंदर्य, स्पर्धा, संवादाचा अभाव, सोशल मीडियामुळे निर्माण झालेला तणाव ही कारणं असल्याचं समोर येतं आहे. 


आत्महत्या टाळण्यासाठी कुटुंब समाजात मैत्रीसाठी पोषक वातावरण गरजेचं आहे. त्यामुळे एकाकीपणा टळेल. मानसिक स्वास्थ्य़ासाठी ध्यानधारणा, विपश्यना गरजेची आहे. नैसर्गिक सौंदर्य मान्य करावं त्याचा विकास व्हावा, पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण होण्याची गरज आहे. विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी पोषक वातावरण आवश्यक आहे. तसंच मानसिक आजार स्वीकारणं आणि त्यासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. 


लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलनं प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार भारतात झालेल्या आत्महत्यांपैकी 63 टक्के तरुणांनी केलेल्या आहेत. भारतीय तरुणाईच्या मृत्यूचं सर्वांत मोठं कारण आत्महत्या असल्याचं देखील समोर आलं आहे.