मुंबई : चीनच्या प्रश्नावरून शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. 'चीन प्रश्नी काँग्रेस सरकारसोबत आहे, मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये असा होत नाही. सीमा सुरक्षेबाबत राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारणं हे राजकारण नाही, तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे. १९६२ आणि आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे,' असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'४५ वर्षात चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता. गलवान खोऱ्यात चीनच्या आगळीकीमुळे २० जवान शहीद झाले. तरीही पंतप्रधान आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही म्हणतात. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहिदांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेस प्रमाणेच शरद पवारांनाही असेल,' अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.


'राहुल गांधी जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारत आहेत. राहुल गांधींची चिंता ही देशाच्या अखंडतेशी संबंधित आहे. आजही मन की बात मांडताना पंतप्रधानांनी चीनच्या आगळीकीबद्दल चकार शब्दही काढला नाही, अशावेळी गप्प बसून कसं चालेल?' असा प्रश्नही थोरात यांनी विचारला आहे.


'भाजपने काँग्रेसच्या सुचनांकडे आणि प्रश्नांकडे राजकारण म्हणून बघू ने, प्रश्न देशाच्या अखंडतेचा आहे, त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस प्रश्न विचारणारच आहे', असं थोरत यांनी स्पष्ट केलं आहे.


'शरद पवार काय बोलले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या एखाद्या विधानावरुन माध्यमांनी निष्कर्षांपर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीनचिट आणि राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आतताईपणा करू नये. मला खात्री आहे, शरद पवार चीनच्या घुसखोरीमुळे चिंतेत असतील,' असंही थोरात म्हणाले. 


काय म्हणाले होते शरद पवार?


गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीवरुन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी भारताचा भूभाग चीनला देऊन टाकल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 


राहुल गांधींच्या या टीकेनंतर शरद पवारांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर राजकारण करू नये, असं म्हणत निशाणा साधला. '१९६२ साली काय झालं होतं, हे विसरून चालणार नाही. चीनने आपल्या ४५ हजार वर्ग किमी जमिनीवर अतिक्रमण केलं. सध्या चीनने भारताच्या कोणत्या भूभागावर कब्जा केलाय, याची माहिती मला नाही. पण यावर चर्चा करत असताना आपल्याला इतिहासात काय झालं, याचीही आठवण ठेवावी लागेल,' असं शरद पवार म्हणाले होते. 


चीनने आपल्या रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तिकडे गस्त होती. त्याठिकाणी धक्काबुक्की झाली म्हणजे, आपलं सैन्य सतर्क होतं. जर तिकडे गस्त नसती, तर चीनी सैनिक कधी आले आणि कधी गेले? हे कळलंही नसतं. गस्त घालताना जर कोणी तुमच्या भागात येत असेल, तर ते दिल्लीत बसलेल्या संरक्षण मंत्र्यांचं अपयश असल्याचं आपण म्हणू शकत नाही,  अशी प्रतिक्रियाही शरद पवारांनी दिली.