Honey Village In Maharashtra: तुम्ही कधी मधाचे गाव याबद्दल ऐकलं आहे का. महाराष्ट्रात भारतातील पहिले मधाचे गाव आहे. मात्र, अलीकडच्या काळात या गावातील मधमाशांवरच संकट घोंगावत आहे. अमेरिकन फ्रौलब्रूड रोगाचा मधमाशांच्या पोळ्यावर प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळं या रोगाचा फटका मध उत्पादनावर पडत आहे. मधाच्या उत्पादनात घट झाल्याचे समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील पहिले मधाचे गाव म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावाची निवड झाली होती. मांघर हे गाव महाबळेश्वरपासून 8 किलोमीटर अंतरावर डोंगरकड्याखाली वसलेले गाव आहे. राज्यात देशातील पहिलं मधाचे गाव साकारण्यात आलं. या गावातून वर्षाला पंधरा हजार किलो मध देशातील विविध बाजारपेठेत पाठवले जाते. मांघर गावातील 80 टक्के ग्रामस्थ मधाचे उत्पादन गेली 50 वर्षांपासून घेत आहेत. तीन रुपयांपासून हा व्यवसाय सुरू झाला होता तो आता 700 ते 800 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. 


महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि रानफुले आहेत त्यामुळं या भागात मधमाश्यांचे प्रमाण जास्त आहे. 2022 मध्ये राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने या गावाला देशातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित केले होते. येथील ग्रामस्थांना तसे प्रशिक्षणदेखील देण्यात आले. ग्रामोद्योग मंडळाने मधपेट्यादेखील दिलेल्या आहेत. गावात घरटी मधाचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक घरात मधपाळ आहेत. गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगलदेखील आहे. तसंच, प्रत्येक गावकऱ्यांकडे कमीत कमी दहा मधमाशा पेट्या आहे. 


मात्र, सध्या मधाच्या गावावर संकट घोंगावत आहे. फ्राउलब्रुड रोगामुळं उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांची घट झाली आहे.  या रोगामुळं मधमाश्या पोळ्यातच मृत्युमुखी पडत आहेत. यामुळं मध संकलित होण्याला बाधा येऊ लागली आहे.