अहमदनगर: सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होता आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असा दावा करणारे ह.भ.प. इंदुरीकर महाराजांवर सध्या टीकेचा झोड उठली आहे. या सगळ्या प्रकारामुळे मी व माझे कुटुंबीय उद्विग्न झालो आहोत. हे सगळे लवकर थांबले नाही तर कीर्तन सोडून शेती करेन, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्यामुळे सध्या इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान, अनेकांनी त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नगर जिल्ह्यातील भिंगार गावात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पार पडले. 


यावेळी इंदुरीकर महाराजांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक (बाऊसर्न्स) तैनात असल्याचे दिसून आले. सुरक्षारक्षकांच्या कडेकोट पहाऱ्यात त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. सुरुवातीला हे कीर्तन होणार की नाही, अशी कुजबुज लोकांमध्ये सुरु होती. मात्र, इंदुरीकर महाराज कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत गावात पोहोचले. गाडीतून उतरल्यानंतर 'बाउन्सर'नी त्यांच्याभोवती कडे केले. त्या सुरक्षेतच त्यांना कीर्तनस्थळी आणण्यात आले. त्यानंतर सर्वात आधी कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी लावण्यात आलेले कॅमेरे काढण्यास सांगण्यात आले. उपस्थित लोकांनाही कीर्तनादरम्यान शुटींग न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.



दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी शिर्डी येथे केलेल्या एका कीर्तनात आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. सम आणि विषम तिथीच्या विधानावर मी अजूनही ठाम आहे. मात्र, या सगळ्या मनस्तापामुळे तीन दिवसांत माझे वजन अर्धा किलोने कमी झाले आहे. यू-ट्युबवाले मला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. कॅमेरावाले मागे लागलेत. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.