Chandrakant Patil : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक (Ink Thrown) करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या फुले-आंबेडकर यांच्या वक्तव्यावरुन वातावरण तापलं आहे. चंद्रकांत पाटील आज पिंपरीत (Pimpri) आले असताना काही जणांनी त्यांच्यावर अचानक शाईफेक केली. यामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. पण यानंतरही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाईफेक करणाऱ्यांना अटक
शाईफेक करणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चंद्रकांत पाटील महोत्सवाच्या उद्घटनासाठी पिंपरीत आले होते. या दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर ही शाईफेक करण्यात आली. यावेळेस चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  तसंच पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत निदर्शनं करण्यात आली. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. 


महोत्सवासाठी पाटील पिंपरीत
श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटन समाधीसाठी चिंचवड गावात आले होते, यावेळी ते एका कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. त्याच्या घरातून निघताना एका व्यक्तीने अचानक समोर येत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. शाईफेक करणारा व्यक्ती चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत होता. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. 


ठाकरे गट आक्रमक
महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गट उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांविरोधात निदर्शंनं केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तर पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या वतीने काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा आडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी येणार असल्यानं विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 


पाटील काय म्हणाले होते?  
"सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते.  10 कोटी देणार लोक आहेत ना", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या पहिल्या तुकडीच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचा या वक्तव्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.


पाटील यांनी व्यक्त केली होती दिलगिरी
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या टीकेनंतर दिलगिरी व्यक्त केली. "बाबासाहेबांनी शिका आणि संघटीत व्हा ही घोषणा दिली नसती तर फार मोठ्या प्रमाणात वर्ग अशिक्षित राहिला असता. मी वर्गणी म्हणायला हवं होतं असे ते म्हणत असतील तर त्याकाळात तसे शब्द नव्हते. त्या काळात भीक मागून मी संस्था उभी केली असे म्हटले जायचे. तरीही  भीक शब्दाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे," असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.