शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : लातूर-बंगळूर-यशवंतपूर ही नवीन रेल्वे येत्या ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र रेल्वेच्या श्रेयावरून सत्ताधारी भाजपमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी मुंबई-लातूर या रेल्वेचे कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीकरण झालं. त्यावेळी यशवंतपूर-बिदर या रेल्वेचे विस्तारीकरण लातूरपर्यंत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.


आता लातूर-बंगळुरू-यशवंतपूर ही नवीन रेल्वेगाडी येत्या ४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. यासाठी लातूर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत या रेल्वेचे श्रेय हे राज्याचे कामगारमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना दिलं.


त्यानंतर लगेच या विषयावर लातूरचे भाजप खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्यावर टीका करत रेल्वे हा विषय खासदारांचा असल्याचं त्यांनी सांगितलं.


भाजपातील या अंतर्गत गटबाजीविषयी राज्याचे कामगारमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना विचारले असता त्यांनी या रेल्वेचे श्रेय हे लातूरच्या जनतेला दिलं. तसेच श्रेयवादाच्या या लढाईवर पडदा टाकण्याचे त्यांनी सांगितले.


एकूणच रेल्वेच्या मुद्द्यावरून लातूर भाजपमधील नेत्यांमधील गटबाजी आणि खदखद यावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षांतर्गत वाद अधोरेखित झाला आहे एवढं मात्र नक्की.