सावरकरांचं गायीबद्दलचं मत मान्य आहे का; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
आपल्यालाच सावरकर कळले आहेत का?, याचा विचार करायला हवा.
नागपूर: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेला कोंडीत धरू पाहणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, सावरकर हा तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, आधी आपल्यालाच सावरकर कळले आहेत का?, याचा विचार करायला हवा. सावरकरांचे समग्र हिंदुत्व, त्यांचे गायीबद्दलचे विचार भाजपला तरी मान्य आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
आम्हालाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्तान हवा आहे, तुम्हाला हवा की नको ते ठरवा. गोवंश हत्याबंदीचा कायदा देशातील सर्व राज्यांमध्ये का लागू करण्यात आला नाही? गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर आणि खासदार किरेन रिजीजू यांचे गोमांस खाण्याबाबतचे मत मांडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
'कायम भाजपची पालखी वाहणार नाही, असा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता'
आपण सावरकरांना मानत असू तर मग देशातील आक्रोश करणाऱ्या हिंदूंचे काय? केंद्र सरकार बाहेरच्या देशातील हिंदूंना आसरा द्याययी भाषा करते. मात्र, आपल्याला देशातील काश्मिरी पंडितांनाच न्याय देता येत नसेल तर बाहेरच्या देशातील हिंदू घेऊन काय करणार, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.
'बेळगाव-कारवारमधील लोक हिंदू नाहीत का?'
आपल्या भाषणात उद्धव यांनी बेळगाव आणि कारवारचा उल्लेख कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असा केला. बेळगाव आणि कारवारमधील मराठी लोकांवर भाषिक अत्याचार सुरु आहेत. त्यांचा आक्रोश भाजपला ऐकू येत नाही का? सीमाभागातील हे लोक हिंदू नाहीत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. केंद्र सरकारची भूमिका पालकाची असायला हवी. मात्र, सीमावादाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नेहमी कर्नाटकची बाजूच उचलून धरली. कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य आहे, केंद्रातही आहे, मग बेळगाव, कारवारचा प्रश्न का सोडवला जात नाही, असा सवालही उद्धव यांनी विचारला.