`पुण्याकडे दुर्लक्ष करुन मुख्यमंत्र्यांचा अजितदादांना अपयशी दाखवण्याचा प्रयत्न?`
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हे वाटून घेतले आहेत का?
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करुन अजित पवार पुण्यात कसे अपयशी ठरले, असं दाखवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हे वाटून घेतले आहेत का? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे कोरोनाच्या काळात पुणेकरांना आश्वस्त करणार का? असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इतर कुणाला मुलाखत दिली नाही, फक्त सामनालाच दिली. आम्ही कधी गमतीनेही सरकार पाडण्याचा उल्लेख केला नाही. आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्नही करत नाही, तरीही ते सारखं तेच का सांगत आहेत? ते साप समजून भुई थोपटत आहेत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मी इथेच बसलोय, सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे
शरद पवार आणि उद्धव ठाकरे सरकार पाडून दाखवा म्हणत आहेत. ते त्यांच्या कार्यकर्त्यांना धीर देत आहेत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना, उपाययोजना राबवण्यात सरकार कमी पडत आहे. त्याविषयी बोललो आणि त्याला राजकारण म्हणणार असाल तर आम्ही ते करणार, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.