तुमची CNG कार सुरक्षित आहे? पैसे वाचवणारं सीएनजी का ठरतंय जीवघेणं?
कर्जत-नेरळ मार्गावर रिक्षा आणि एका भरधाव कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यात तिघांचा मृत्यू झाला.
मुंबई : कर्जत-नेरळ मार्गावर रिक्षा आणि एका भरधाव कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यात तिघांचा मृत्यू झाला. यात चूक कुणाची हे चौकशीअंती समोर येईलच पण या अपघातानं सीएनजी कारच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या अपघातात धडकेनंतर अवघ्या काही क्षणांमध्ये रिक्षातल्या सीएनजी सिलिंडरचा स्फोट झाला आणि दोन्ही वाहनांनी लागलीच पेट घेतला. त्यामुळे इंधनावरील खर्च वाचवण्यासाठी वापरलं जाणारं सीएनजी वाहन खरच सुरक्षित आहे का ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
का घेतले जाते सीएनजी वाहन?
सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस..हे एक वायुरूपी इंधन आहे. तो हवेपेक्षा हलका आहे. शिवाय पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी गाडी जास्त मायलेज देते. त्यामुळेच सीएनजी गाड्यांना मागणी अधिक आहे.
असं असलं तरी सीएनजी वाहनातल्या धोक्यांकडेही दुर्लक्ष करता येत नाही. गेल्या काही दिवसांत सीएनजी वाहनांच्या अपघातांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे सीएनजी वाहनचालकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.
काय काळजी घ्याल?
1. उन्हाळ्यात सीएनजी वाहनात एसीचा अधिक वापर करावा. कारमधील केबिन थंड राहिल याची काळजी घ्यावी.
2. सीएनजीची गळती होत असल्यास वाहन तात्काळ थांबवावं.
3. प्रशिक्षित मेकॅनिककडून दुरूस्ती करून घ्यावी.
4. सिलेंडर आणि इंजिनला जोडणा-या पाईपलाईनची वेळोवेळी तपासणी करावी.
5. कारमध्ये सिगारेट, लायटर आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर करू नये. त्यामुळे कार पेट घेऊ शकते.