`इस्लाम धर्म हाच हिंदुस्तानचा खरा शत्रू` संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
संभाजी भिडे यांनी या आधीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिरुर : आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. 'इस्लाम धर्म हाच हिंदुस्तानचा खरा शत्रू' असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सर्वत्र पाळला जातो. यानिमित्ताने संभाजी भिडे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
आज औरंगजेब नसला तरी पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतातील मुस्लिम समाजाच्या रूपाने तो शत्रु आज हिंदू समाजाच्या पुढे ठाकला आहे. देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी ऐन तारुण्यात संभाजीमहाराजांनी बलिदान पत्करले पण धर्म सोडला नाही.
औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या ही इस्लामच्या पोटतिकडीतून केली. हिंदू समाजामध्ये पोटतिडकीने झालेल्या या बलीदानाचा सूड घेण्याची ताकद प्रत्येक हिंदू दाखवेल, असा एक दिवस नक्की उगवेल आणि हीच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानातील हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली असेल असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर असा देश तुकडे-तुकडे करुन हिंदू धर्म आणि हिंदू समाज संपवून टाकावा अशी औरंगजेबाजाची भावना होती, असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
संभाजी भिडे यांनी या आधीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आता इस्लाम धर्मावरील वक्तव्याने आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.