सांगली : इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच मारहाणीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी  प्रज्ञा पवार यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, महिला आयोगाला त्यांनी घटनेबाबतचे पत्र दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी दुपारी शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीमधून दारु वाहतूक होत असल्याबाबत त्या प्रभागाचे नगरसेवक अमित ओसवाल यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. ही बाब गंभीर असल्याने आणि नगरपालिकेची प्रतिमा मलीन होऊन पालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारी असल्याने संबंधित वाहनावरील ठेकेदारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी करण्याचे आदेश त्या मुकादमाला दिले. त्यांनतर चिडलेल्या राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांनी थेट केबिनमध्ये घुसून नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार याना शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांनी थेट केबिनमध्ये घुसून नगरपपिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या अंगावर खुर्ची घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. बघून घेतो, अशी धमकी दिली. मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी खंडेराव जाधव यांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, मारहाणीचा प्रयत्न आणि शिवीगाळ प्रकरणी जाधव यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल आहे.