भारतीय सैन्याचा राजकीय वापर करणे चुकीचे - माजी लष्करी अधिकारी
`लष्कर किंवा भारतीय सैन्य यांचा वापर राजकारणात करण्यात आला तर आपलीही परिस्थिती पाकिस्तान सारखी होऊ शकते.`
नागपूर : लष्कर किंवा भारतीय सैन्य हे नेहमीच अराजकीय राहिले आहे, सुरक्षा दलाचा वापर राजकारणासाठी करणे हे अयोग्यच असल्याचं मत माजी सैन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. सुरक्षा दल हे राजकारणापासून नेहमीच दूर राहिले आहेत. त्यांच्या शौर्याचा वापर करणे हे चुकीचे आहे. राजकारणापासून लष्कर, नौदल व वायू सेने नेहमीच दूर राहिली आहे. जर त्यांचा वापर राजकारणात करण्यात आला तर आपलीही परिस्थिती पाकिस्तान सारखी होऊ शकते, असे परखड मत माजी लष्करी अधिकारी अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान हे कुठल्याही सैन्य कारवाईचे नेतृत्व करतात. सरकारमधील मंत्री स्वतः काही हातात बंदुका घेऊन सीमेवर लढायला जात नाही. त्यामुळे सेनेच्या कारवाईचे पंतप्रधान हे नेतृत्व करतात, असे मत माजी विंग कमांडर अशोक मोटे यांनी व्यक्त केले. उरी हल्ल्यानंतर केलेले सर्जिकल स्ट्राईक असो किंवा पुलवामा घटनेनंतर केलेला एअर स्ट्राईक. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मजबूत नेतृत्वामुळे हे शक्य झाले आणि ते आपल्याला मान्य करावे लागेल, असेही मोटे यांनी सांगितले.