Kokan Rain Update : रत्नागिरीतील खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलीय. तर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. 


रायगडमधील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडमधील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागोठणे शहरात अंबा नदीचं पाणी शिरल आहे. शहरातील एसटी स्थानक आणि कोळीवाडा परिसर जलमय झाला आहे. या भागात सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र,  मुळशी धरणातील पाणी थेट अंबा नदीच्या पात्रात दाखल झाल्यानं अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीची धोक्याची पातळी 9 मीटर एवढी असून सध्या नदी 9.20 मीटवर पोहोचली आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे. 


रोह्यात कुंडलिका नदीच्या पाणीपातळीत वाढ


मुसळधार पावसामुळे रोह्यात कुंडलिका नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका नदीचं पाणी इशारा पातळीवर गेले आहे.  प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नगरपालिकेने दवंडी पिटून  सावधानतेचा इशारा दिला आहे. कुंडलिका नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहून लागले आहे. त्यामुळे जुना पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. बॅरीगेटींग करून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 


कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील पूल पाण्याखाली


कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे नदीजवळच्या 10 ते 12 गावांचा  शहराशी संपर्क तुटलाय. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत. नागरिक पुलावरील पाणी ओसरण्याची वाट पाहतायत. मागील 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे परिसरातील नदी,नाले दुथडी भरून वाहतायत. 


भिवंडी शहर पाण्याखाली


भिवंडी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचलंय.... भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी शिरलं... तर खाडी किनारी असलेल्या ईदगाह या झोपडपट्टीमध्ये चार फुटापर्यंत पाणी साचल्यानं नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं.. शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद झालाय.... तसंच कामवारी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालीये.... अशी पूर परिस्थीती असताना सुद्धा भिवंडी महापालिका या ठिकाणी मदतीसाठी आली नाही... त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय ..