योगेश खरे, झी मीडिया, नाशिक: गुळाचा आहारात समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. गुळाचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामध्ये नैसर्गिक गोडवा असल्याने अनेक जण जेवणानंतर गूळ खातात. गुळात पोषक तत्त्व असल्याने घराघरांत गुळाचा वापर वाढला आहे. मात्र सावधान तुम्ही खात असलेला गूळ भेसळयुक्त तर नाही ना? कारण नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत 2 लाख 40 हजार 480 रुपये किमतीचा 3006 किलो गूळ जप्त केला आहे. नाशिकच्या रविवार पेठेत होलसेल गुळाची विक्री करणाऱ्या एका  ट्रेडींग कंपनीत भेसळीच्या संशयावरून सोमवारी दि. 13 जून रोजी अन्न प्रशासन विभागाने छापा टाकला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक किरकोळ विक्रेते होलसेल व्यापाऱ्यांकडून गूळ खरेदी करून त्याची सेंद्रिय गूळ म्हणून विक्री करतात. गुळाची विक्री करण्यासाठी शहरात येणाऱ्या महामार्गांवर ठिकठिकाणी चारचाकी वाहनातून गुळाची विक्रीही होताना दिसते. गुळामध्ये रंग टाकून भेसळ केली जात असल्याची तक्रार अन्न औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे, योगेश देशमुख यांच्या पथकाने रविवार पेठेतील एका ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून गूळ जप्त केला आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


जप्त केलेला गूळ संबंधित कंपनीतच सील करण्यात आला असून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती अन्नसुरक्षा अधिकारी रासकर यांनी दिली. नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके, सहायक आयुक्त गणेश परळीकर व विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.