नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जमिनीच्या वादातून (land dispute) अनेक गुन्हे घडताना तुम्ही पाहिले असतील. पण माणसाच्या मृ्त्यूनंतरही जमिनीच्या वाद झाल्याचा प्रकार जालन्यात (Jalana News) घडलाय. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं आणि पोलिसांना (Jalana Police) या प्रकरणी मध्यस्थी करावी लागली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंत्यविधी करताना दोन गटात तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या मच्छिंद्रनाथ चिंचोली गावात घडली. मच्छिंद्रनाथ चिंचोली गावातील कमलाबाई रामभाऊ आधुडे या महिलेचं निधन झालं होतं. यावेळी कमलाबाई आधुडे यांच्या अंत्यविधीसाठी बसस्थानकाजवळील जुन्या स्मशानभूमीत सरण रचण्यात आलं होतं. अत्यसंस्कार सुरु असतानाच तिथे विष्णू खोसे नावाच्या व्यक्तीने येत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.


अत्यंविधी सुरु असलेल्या जागेवर दावा करत विष्णू खोसे याने वाद घालण्यास सुरुवात केली. ही जागा माझी आहे, कोर्टात याच्यावर माझ्या बाजूने निकाल लागला आहेत म्हणून इथे अंत्यविधी करायचे नाहीत, अशी आक्रमक भूमिका विष्णू खोसे याने घेतली. अंत्यविधी रोखल्यानं मयत कमलाबाई यांचे नातेवाईक चांगलेच संतापले. यानंतर सुरु झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. 


दरम्यान, हा वाद इतका पेटला की अंत्यविधीच्या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला आणि हाणामारी सुरु झाली. यासोबतच दगडफेकही सुरु झाली. यानंतर पोलिसांला पाचारण करावं लागलं. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मात्र या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.