पतीच्या अनैतिक संबंधांची ऑडीओ क्लीप माहेरच्यांना पाठवली, नंतर आढळला लिंबू कोंबलेला पत्नीचा मृतदेह
पतीच्या अनैतिक संबंधांची ऑडीओ क्लीप माहेरच्यांना पाठवली. तोंडात लिंबू कोंबून पत्नीचा खून. माहेरच्यांचा आरोप, मयत महिलेच्या पतीसह,सासू, सासरा, नणंद विरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
नितेश महाजन, झी २४ तास, जालना : पतीच्या अनैतिक संबंधांची ऑडीओ क्लीप माहेरच्या लोकांना पाठवल्याच्या रागातून पत्नीच्या तोंडात लिंबू कोंबून तिचा खून केल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातवाईकांनी केला आहे. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे ही घटना घडलीय. 22 वर्षीय नुसरत इम्रान कुरेशी असं मयत विवाहित महिलेचं नाव आहे. या महिलेचा खून केल्याप्रकरणी तिचा पती इम्रान महेमुद,सासू,सासरा,नणंद, नणंदवई यांच्या विरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हसनाबादमधील कुरेशी मोहल्ला भागात राहत्या घरात 31 मे रोजी नुसरत महेमूद या महिलेचा मृतदेह आढळून आला. नुसरतने पतीच्या अनैतिक संबंधांची ऑडीओ क्लीप माहेरच्या लोकांना पाठवली. तसेच व्यवसायासाठी नुसरतचा पती एक लाखांची मागणी करत होता, असा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातवाईकांनी केला. नुसरत वेड्यासारखी करते असं म्हणत सासरच्या मंडळींनी तिला दर्ग्यात नेऊन तिच्या तोंडात लिंबू कोंबून तिला मारहाण केल्याचा आरोप देखील नुसरतच्या नातवाईकांनी केला. दोन महिन्यांपूर्वीच नुसरतचा विवाह झाला होता. विवाहानंतर एक महिना तिला चांगली वागणूक दिली. नंतर मात्र तिचा हुंड्यासाठी छळ सुरु झाला.अशी तक्रार हसनाबाद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
घरात नुसरतचा मृतदेह आढळून आल्यानंतर नंतर शवविच्छेदनसाठी हसनाबादमधीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर मयत महिलेच्या माहेरच्या नातवाईकांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मयत महिलेचा पती इम्रान महेमुद,सासू,सासरा,नणंद, नणंदवई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हसनाबाद पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Jalana crime news wife found dead after audio clip of husband cheating sent to in laws