जळगावः पाचोरा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पडक्या शाळेत एका जोडप्याने आत्महत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. (Jalgaon Couple Suicide)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचोरा शहरातील मोंढाळे रोड वरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना पहाटे सुमारास उघडकीस आल्याने जिल्हयाच मोठी खळबळ उडाली आहे. जितेंद्र राजु राठोड (वय - १९) व (वय -१८) दोन्ही रा. वरखेडी नाका परिसर, पाचोरा असे मयत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. 


कुटुंबियांचा लग्नाला विरोध


दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, त्यांच्या कुटुंबियांकडून दोघांच्या लग्नाला विरोध होता. त्यात साक्षी हिचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र तिला तो विवाह मान्य नव्हता म्हणून ती माहेरी आली होती. त्यानंतर जितेंद्र व साक्षी या दोघांनी टोकांचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


माहेरपणाला आली होती घरी


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री जितेंद्र व साक्षी या दोघांनी फोनवरुन एकमेकांना संपर्क केला होता. त्यानंतर दोघांनी घराच्या मागे असलेल्या मोंढाळा रोडवरील पडक्या शाळेत भेटायचे ठरवले. त्यानुसार ते रात्री भेटले आणि दोघांनीही एकाच दोरीने गळफास घेत आयुष्य संपवले. 


भावाला मध्यरात्री जाग आली अन्...


दरम्यान, साक्षीच्या भावाला मध्यरात्री जाग आल्यानंतर ती घरात नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर घराच्या मागे असलेल्या पडक्या शाळेत शोध घेतला. तेव्हा साक्षी आणि जितेंद्र हे दोघेही गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. 


दोन दिवसांपूर्वी झाला होता विवाह


माहेरपणासाठी आलेल्या लेकीने असं पाऊल उचलल्याने साक्षीच्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. 23 जून रोजीच साक्षीचा विवाह झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आलेल्या साक्षीने जितेंद्रसोबत संपर्क करत आयुष्य संपवले आहे. 


एकाच शहरात राहत होते


घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जितेंद्र आणि साक्षी हे दोघंही एकाच शहरात राहत होते. जितेंद्रच्या घरापासून दोन घरे सोडून काही अंतरावर साक्षीचे घर आहे.