विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव: माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी आज (रविवार, १५ जुलै) मतदान होतंय. या निवडणुकीत खडसेंविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे. तर, भाजप, काँग्रेस मात्र स्वबळावर लढत आहेत. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या १८ जागांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडतेय. खडसे यांचे होम पीच असल्यानं त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. एकूण १८ जागांसाठी हे मतदान होत आहे.


शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. तर, काँग्रेस आणि भाजप ही निवडणूक  स्वबळावर लढवत आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भाजप, सेना आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये तिरंगी लढत असल्यानं प्रचंड राजकीय चुरस आहे. तर नगरसेवकपदाच्या निवडणुकीतदेखील तिरंगी लढत आहे. भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिलेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीला सगळ्या जागांवर उमेदवारही देता आले नाहीत हे विशेष. दरम्यान, खडसे यांचे होम पीच असल्यानं त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय.


एकनाथ खडसेंकडून गल्लीबोळातही प्रचार


तालुक्याची सगळी सत्तास्थाने ताब्यात असताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये गेल्या तीस वर्षात विकासचं केला नाही. विधानसभेचं अधिवेशन सोडून राज्याचे नेते असलेले खडसे गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत. हेच त्यांचे अपयश असल्याची टीका खडसेंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेनं केलीय. खडसे यांच्यासारखे नेते असताना मुक्ताईनगर शहराची झालेली बकाल व्यवस्था हाच काँग्रेसचाही या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा राहिला आहे.


खडसेंची प्रतिष्ठा पणाला


नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक असून, खडसेंनी निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावलीय. जामनरेमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पालिकेवर मिळविलेल्या १०० टक्के विजयाची पुनरावृत्ती खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये होईल का याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलय. 


पक्षनिहाय उमेदवार: 


१) भाजप: एकूण लोकनियुक्त नगराध्यक्षासह १८ उमेदवार रिंगणात आहेत.
२) शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. 
 नगराध्यक्षासह शिवसेनेचे १५ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. 
३) काँग्रेसचे नगराध्यक्षासह ९ उमेदवार रिंगणात आहेत.